योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News :अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये (GMC) पुन्हा एकदा आरोग्य सेवेतील गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या दुर्लक्षामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मोहखेड येथील अरविंद अघमे (Arvind Aghame) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी जीएमसीच्या अपघात कक्षात (Casualty Ward) दाखल करण्यात आले होते.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी प्राथमिक उपचार म्हणून रुग्णाला ऑक्सिजन लावला आणि पुढील उपचारांसाठी वॉर्ड क्रमांक 9 मध्ये हलवण्याचे निर्देश दिले. यावेळी वॉर्ड बॉय (Ward Boy) गैरहजर असल्याने नातेवाईकांनीच रुग्णाला वॉर्ड 9 मध्ये हलवले. मात्र, तिथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाला पुन्हा अपघात कक्षात आणावे लागले. अपघात कक्षात पुन्हा आणल्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन न लावता केवळ पलंगावर झोपवून ठेवण्यात आले, अशी तक्रार त्याच्या पत्नीनं केली आहे. या उपचारादरम्यान डॉक्टर किंवा परिचारिका तिथं उपस्थित नव्हती.
( नक्की वाचा : Akola News : 'प्रशासन ऐकत नाही, म्हणून फाशी घेईन', अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच नागरिकाचा संताप )
वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू
"ऑक्सिजन न मिळाल्याने आणि कोणीही वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नसल्याने माझ्या पतीचा मृत्यू झाला," असा गंभीर आरोप मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या तक्रारीत केला आहे.
चौकशी समितीची स्थापनाा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जीएमसी प्रशासनाने तक्रार मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने (Dr. Sanjay Sonune) यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेच्या चौकशीसाठी तातडीने समिती स्थापन करण्यात आली आहे.
"समितीच्या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल," असे आश्वासन वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामसुंदर सिरसाम (Dr. Shyamsundar Sirsam) यांनी दिली आहे.
अकोलामध्ये महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नुकताच एका व्यक्तीचा गटारीत वाहून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्याचवेळी आरोग्य व्यवस्थेतील ही आणखी एक बेफिकिरीची घटना समोर आल्याने अकोल्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.