
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला शहरातील टिळक रोड परिसरामध्ये आज, (शनिवार 27 सप्टेंबर) संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बियाणी चौक परिसरात जोरदार पावसामुळे तुडुंब भरलेल्या उघड्या गटारात तोल जाऊन एक नागरिक वाहून बेपत्ता झाला आहे. महापालिकेच्या अनेक महिन्यांच्या घोर दुर्लक्षातून ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, संपूर्ण शहरात प्रशासनाविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला शहरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सायंकाळी पाचच्या सुमारास टिळक रोडवरील उघड्या भूमिगत गटाराजवळून एक नागरिक जात असताना, पाण्याचा प्रवाह आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांचा तोल सुटला आणि ते थेट गटारात कोसळला. गटार पूर्णपणे भरलेले असल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने ते तात्काळ वाहून गेले आणि अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
( नक्की वाचा : Akola News : 'प्रशासन ऐकत नाही, म्हणून फाशी घेईन', अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच नागरिकाचा संताप )
महापालिकेवर संताप
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गटाराचा हा भाग गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत उघडा पडलेला होता. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.
"आम्ही अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्ती झाली नाही. प्रशासनाच्या याच निष्काळजीपणामुळे आज एका नागरिकाला जीव गमवावा लागण्याची वेळ आली आहे. या घटनेची जबाबदारी कोण घेणार?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेमुळे अकोला महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
50 फूट खोलवर शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू करत गटारात सुमारे 50 फूट आतपर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र, बेपत्ता झालेल्या नागरिकाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
यावेळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्यासह रामदास पेठ आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. युद्धपातळीवर सुरू असलेली ही शोधमोहीम आज थांबवण्यात आली असून, उद्या (रविवार, 28 सप्टेंबर) पुन्हा सुरू केली जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world