योगेश शिरसाट प्रतिनिधी अकोला
Akola News: अकोला महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहाच्या नावावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या सभागृहाचे सध्याचे नाव बदलून त्याऐवजी सर्वांना मान्य होईल असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे. यासंदर्भात शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी महापौर आणि आयुक्तांना निवेदन दिले असून, यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला सध्या शहीदे वतन हजरत टिपू सुलतान असे नाव आहे. हे नामकरण सन 2012 मध्ये करण्यात आले होते. तत्कालीन नगरसेवक आणि सध्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी ही मागणी केली होती आणि त्यावेळच्या सभागृहातील बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, आता अनेक वर्षांनंतर या नावावरून विविध समाजघटकांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. या नावामुळे शहरात सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत शिंदे गटाने हे नाव रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.
( नक्की वाचा : Akola News :'टिपू सुलतान'वरून अकोला महापालिकेत तणाव; पाहा, राजकीय वादात AIMIM नं नक्की काय केलं? )
शिवसेनेचे भूमिका आणि पर्यायी नावे
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी आपल्या निवेदनात टिपू सुलतान यांच्याबद्दल देशात असलेल्या भिन्न मतप्रवाहांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, काही लोक त्यांना शूर योद्धा मानतात, तर काही समाजघटक त्यांच्या कार्यकाळावर गंभीर आक्षेप घेतात. स्थायी समिती सभागृह हे शहराच्या विकासाचे मुख्य केंद्र असल्याने तेथे वादाऐवजी एकात्मतेचे प्रतीक असणारे नाव असावे, अशी त्यांची भूमिका आहे.
यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या नावांचा किंवा संविधान सभागृह, लोकशाही भवन, समता-सौहार्द सभागृह अशा नावांचा पर्याय सुचवला आहे.
( नक्की वाचा : Gram Panchayat : मुदत संपली तरी खुर्ची कायम! ग्रामपंचायतींबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर )
या वादात आता भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनीही उडी घेतली आहे. प्रशासनाने या प्रकरणात स्वतःहून म्हणजेच सुमोटो कारवाई करून नाव बदलावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सत्तांतर झाल्यानंतर जुन्या आणि वादग्रस्त ठरावांचा फेरविचार करणे हा लोकशाहीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रमेश गायकवाड यांनी हा विषय केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही नेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मागणीमुळे अकोल्यात आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.