योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळ सुरू आहे, याचे एक भयंकर उदाहरण अकोल्यात समोर आले आहे. राज्यभरात सध्या कलिंगडातून विषबाधेच्या घटनांची चर्चा असतानाच, एका बड्या ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीने एक्सपायर झालेले अन्नपदार्थ ग्राहकाच्या घरी पोहोचवल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे नेमकी घटना?
वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी ब्लिंकिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मटकी स्प्राऊट्सचे 200 ग्रॅमचे एक पाकीट ऑर्डर केले होते. ऑर्डर घरी आल्यानंतर त्यांनी ते पार्सल उघडले, तेव्हा त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. संशय आल्याने त्यांनी पाकिटावरील तारखेची बारकाईने पाहणी केली. तेव्हा समोर आलेली माहिती पाहून त्यांना धक्काच बसला.
त्या मटकीच्या पाकिटाची एक्सपायरी डेट ही 12 एप्रिल 2026 अशी होती. म्हणजेच मुदत संपलेले अन्नपदार्थ बिनदिक्कतपणे विकले जात असल्याचे समोर आले आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवायला जाताय? आधी ही बातमी वाचा! QR कोड स्कॅन करताच तरुणीला थरारक अनुभव )
जबाबदारी झटकण्याचा कंपनीचा प्रयत्न
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अरुंधती शिरसाट यांनी तातडीने संबंधित डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधला. मात्र, कंपनीने एवढ्या गंभीर चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी किंवा कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी केवळ पैसे परत (रिफंड) करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोकांच्या जिवाशी खेळ होत असताना केवळ पैसे परत देऊन जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत ग्राहकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Edible Oil: विदेशी तेलाचा विळखा सुटणार! देशात खाद्य तेलात क्रांती होणार; पाहा काय आहे केंद्र सरकारचा नवा प्लॅन )
अन्न आणि औषध प्रशासनाचे मौन
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अकोल्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणा अशा गंभीर प्रकरणांकडे डोळेझाक करत आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शहरात ऑनलाइन कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची विक्री होत असताना त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचे खराब आणि बुरशीजन्य अन्नपदार्थ खाण्यात आले असते, तर मोठा अनर्थ घडला असता अशी भीती व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुंधती शिरसाट यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांनीही आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.