Pune News: पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या तरुणीला मध्यरात्री एका अज्ञात नंबरवरून मेसेज येतो आणि तिथूनच एका धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. तंत्रज्ञानाच्या युगात आपण हॉटेलमध्ये गेल्यावर स्कॅन करत असलेला 'QR कोड' तुमच्या खाजगी माहितीसाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. पुण्यातील एफसी रोडवर (FC Road) घडलेल्या या प्रकरणाने महिला सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ऋषिका दत्ता ही तरुणी 28 एप्रिल रोजी पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये गेली होती. तिथे डिजिटल मेन्यू पाहण्यासाठी तिने टेबलावर असलेला QR कोड स्कॅन केला. मात्र, या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेतून तिचा मोबाईल नंबर हॉटेलच्या सिस्टीममध्ये नोंदवला गेला. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच दिवशी मध्यरात्री तिला एका वेगळ्याच नंबरवरून वैयक्तिक मेसेज येण्यास सुरुवात झाली.
हॉटेल कर्मचाऱ्याचाच कारनामा
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकाने जेव्हा त्या मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला, तेव्हा तो त्याच हॉटेलमधील कर्मचारी असल्याचे समोर आले. हॉटेलच्या QR कोड सिस्टीममधून त्या कर्मचाऱ्याने तिचा नंबर चोरला आणि तिला मैत्री करण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवले. या घटनेने ऋषिकाला मोठा मानसिक धक्का बसला असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार जगासमोर मांडला आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )
हॉटेल प्रशासनाची भूमिका आणि वाद
ऋषिकाने या प्रकाराबद्दल हॉटेल व्यवस्थापनाकडे जाब विचारला आणि कडक कारवाईची मागणी केली. हॉटेलने तिला तोंडी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, कर्मचाऱ्याला कामावरून काढल्याचा कोणताही लेखी पुरावा किंवा अधिकृत माफीनामा देण्यास हॉटेलने नकार दिल्याचे ऋषिकाचे म्हणणे आहे.
यानंतर हॉटेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीत घरांच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; संरक्षण खात्याच्या जमिनीवर बांधल्या चाळी, शेकडो.. )
QR कोड आणि गोपनीयतेचा प्रश्न
या घटनेमुळे हॉटेलमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या QR कोड सिस्टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकदा डिजिटल मेन्यू पाहताना ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. हा डेटा कोणाकडे जातो आणि त्याचा वापर कसा केला जातो, याबाबत कोणतीही स्पष्टता नसते. सोशल मीडियावर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला असून, जे हॉटेल पेपर मेन्यू देत नाहीत, तिथे जाणे बंद करण्याचा पवित्रा काही ग्राहकांनी घेतला आहे.
महिला सुरक्षेचा गंभीर विषय
एकीकडे पुणे शहर सुरक्षित असल्याचे मानले जात असताना, अशा प्रकारे हॉटेलमधील डेटाचा वापर करून महिलांना त्रास देण्याचे प्रकार चिंताजनक आहेत. नवी मुंबईतील एका मॉलमध्येही असाच प्रकार घडल्याचे एका महिलेने सांगितले आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना आता नागरिकांनी, विशेषतः महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world