योगेश शिरसाट
जाती आणि धर्माच्या भींती आजही समाजात असल्याचं दिसून येत आहे. जात जाता जात नाही अशीच काही स्थिती आहे. त्याचा प्रत्यय अकोल्यात आला आहे. दलित असल्याचे समजल्यावर एका महिला पदाधिकाऱ्याला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाच दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर हॉटेल मालकही याबाबत काही बोलत नाही. त्यामुळे अधिक संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
धम्मचक्र दिनासाठी आलेल्या वंचितच्या नेत्या अकोल्यात आल्या होत्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या 3 ऑक्टोंबर रोजी जाहीर सभा झाली. या भव्य धम्म मेळाव्याच्या जाहीर सभेला हजेरी लावण्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी अकोल्यात आल्या होत्या. त्या मुक्कामासाठी ‘रायझिंगसन' या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. सुरुवातीला त्यांना रूम दाखवण्यात आली. मात्र, त्या सामान आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचशील व निळा ध्वज पाहून हॉटेल व्यवस्थापकाने अचानक रूम देण्यास नकार दिला.
नक्की वाचा - Akola News: अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दिवसाढवळ्या अश्लील चाळे, Video viral
गंभीर आरोप आणि तक्रार दाखल
प्रवेश नाकारल्याचे कारण वेगळे सांगण्यात आले असले तरी, दलित असल्यामुळेच भेदभाव झाल्याचा आरोप स्नेहल सोहनी यांनी केला. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हॉटेल मालक आणि व्यवस्थापकविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु चार दिवस उलटूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
पोलिस आरोपीला पाठीशी घालत आहेत का?
स्नेहल सोहनी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत विचारले की, “अकोला पोलिस आरोपीला पाठीशी घालत आहेत का? तसे असेल, तर मुंबई पोलिसांना अकोल्यात यावे लागेल का?” त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला. दलित चळवळीत कार्यरत असलेल्या महिला नेत्याला रूम नाकारणे हे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी व त्यांच्या युवक आघाडीने संताप व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
कडक कारवाई करा
वंचितचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास “वंचित स्टाईल”मध्ये हॉटेल प्रशासनाला धडा शिकवू असा इशारा दिला आहे. स्नेहल सोहनी यांनीही न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे सांगत “न्याय मिळेल पण स्वस्त बसणार नाही” असा ठाम इशारा दिला. दरम्यान हॉटेल मालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर दलित महिला नेत्याला केवळ तिच्या ओळखीवरून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होत असून न्यायव्यवस्थेची ही मोठी कसोटी ठरणार आहे.