योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: राज्य मंत्रिमंडळाने अकोल्यातील शहर बस स्थानक, भाजीपाला बाजार आणि व्यावसायिक संकुलाची सुमारे 24,579.82 चौरस मीटर जमीन अकोला महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जात असला तरी, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मात्र या निर्णयामुळे तीव्र असंतोष पसरला आहे.
व्यापाऱ्यांमध्ये भीती
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विशेषतः भाजीपाला बाजारातील व्यापारी चिंतेत आहेत. या निर्णयामुळे पारंपारिक बाजार व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, अशी त्यांना भीती आहे. त्यांच्या मते, या बदलामुळे जवळपास 700 हून अधिक छोटे दुकानदार, फेरीवाले आणि मजुरांचा रोजगार धोक्यात येईल, ज्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.
जनता भाजी बाजार संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितले की, महसूल मंत्रालयाने यापूर्वीही याबाबत आदेश दिले होते, मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतले गेले नाही. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय झाला, तर समिती न्यायालयात दाद मागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
( नक्की वाचा : Nitin Gadkari : गडकरींच्या मुलांबाबत धक्कादायक खुलासा, दिवसाला 144 कोटींची कमाई करत असल्याचा खळबळजनक आरोप )
विद्यमान बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात
व्यापाऱ्यांनी या विषयावर केलेल्या दाव्यानुसार, नवीन व्यावसायिक संकुल आणि बस स्थानक उभारले गेल्यास सध्याचा भाजीपाला बाजार संपुष्टात येईल. त्यामुळे बाजारात कार्यरत शेकडो व्यापारी आणि फेरीवाले थेट प्रभावित होतील. यामुळे बाजारातील व्यवहार, ग्राहकांचा विश्वास आणि स्थानिक अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची भीती त्यांना वाटत आहे.
सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा, मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाकडे शहरातील राजकीय आणि सामाजिक संघटनांचे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.