योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : लग्नसराई म्हटलं की मोठा थाट असतो. लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अनेक कुटुंब आपली जमापुंजी लेकीच्या लग्नासाठी खर्च करतात. प्रीवेडिंगसाठीही लाखो रुपये खर्च केले जातात. त्याशिवाय लग्नासाठीचा बस्त्यातही मोठा खर्च करावा लागतो. महागड्या भेटवस्तू आणि शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळते. मात्र अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील मांजरी गावात झालेला एक विवाह सोहळा याला पूर्णपणे अपवाद ठरला आहे.
या गावात अनोख्या पद्धतीने वधू आणि वर पक्षाकडून महापुरुषांचे फोटो, विचारांची पुस्तके आणि गुलाब पुष्प देऊन एकमेकांचं स्वागत करण्यात आलं. समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक पद्धतीऐवजी सामाजिक आणि वैचारिक संदेश देण्याचा प्रयत्न या विवाहातून करण्यात आला.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न..
यादरम्यान, नवदीप वधू-वर यांच्या जीवनात महापुरुषांचे विचार रुजले जावेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची पुस्तके भेट देत नवदाम्पत्याच्या जीवनात प्रेरणादायी विचार रुजावेत, हा मुख्य उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. आजच्या धावपळीच्या आणि दिखाऊपणाच्या युगात महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची भावना दोन्ही कुटुंबीयांनी व्यक्त केली. शाल व श्रीफळ न देता ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारे साहित्य भेट म्हणून देण्याचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भारतीय सैन्य दलातील जवानाचा विवाह चर्चेचा विषय..
अकोल्याच्या मांजरी गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप हेरोळे यांच्या कन्या प्रेरणा हिचा विवाह मुर्तीजापुर तालुक्यातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल तायडे यांच्यासोबत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दरम्यान, विवाह सोहळ्यात राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात या लग्नाची चर्चा रंगली आहे. उपस्थित नागरिकांनी या अभिनव संकल्पनेचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजात गरज असल्याचे मत व्यक्त केले. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा आणि विचारांचा मिलाप असतो, हा संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला. आता हाच विचार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवल्या जातोय का असा सर्वसाधारण प्रयत्न आपल्या विवाह सोहळ्यात करावा असंही सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जाते.