योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातल्या मन नदीच्या डोहाने दोन जणांचा बळी घेतलाय. भर उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना थंडाव्यासाठी नदीवर गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांवर काळाने झडप घातली. पोहण्याचा आनंद साजरा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही डोहाच्या खोल पाण्यात ओढले गेले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलगा बु. परिसरातील ही घटना आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले चार मित्र आज दुपारच्या सुमारास मन नदीच्या काठी पोहण्यासाठी गेले होते. चिखलगाव येथील अजाबराव तायडे आणि तुलगा बु. येथील दिलीप मुंडे या दोन व्यक्तींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
नदीचा डोह वरून शांत दिसत असला तरी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे दोन्ही मित्र अचानक बुडू लागले. सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
(नक्की वाचा : Akola News : चॉकलेटच्या नावाखाली 60 वर्षांच्या नराधमाने काय केलं? 10 वर्षांच्या चिमुकलीसोबत वारंवार... )
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नदीकाठी धाव घेतली. स्थानिक साधनांच्या आणि दोरखंडाच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. जवळजवळ 2 तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. आपल्या माणसांचा असा शेवट पाहून नातेवाईकांनी घटनास्थळी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
प्रशासनाकडून सुरक्षेचे आवाहन
उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नद्या, नाले आणि डोहांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. मात्र, अनेक ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नाही किंवा खोल डोह जीवघेणे ठरतात.
या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पोहायला येत नसताना किंवा पाण्याचा अंदाज नसताना खोल पाण्यात उतरू नये. शांत दिसणाऱ्या पाण्याच्या खाली खोल डोह किंवा भोवरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडाव्यासाठी नदीवर जाताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Milind Soman: 60 व्या वर्षी समुद्राला नमवलं! मिलिंद सोमणच्या 'सुपर फिट' राहण्याचं गुपित उघड ! )
नदीकाठी सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी
पातूर तालुक्यातील या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी संताप आणि दुःख व्यक्त केले आहे. नदीपात्रातील धोकादायक ठिकाणांवर किंवा डोहांच्या ठिकाणी प्रशासनाने सावधगिरीचे फलक लावावेत आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.