जाहिरात

Milind Soman: 60 व्या वर्षी समुद्राला नमवलं! मिलिंद सोमणच्या 'सुपर फिट' राहण्याचं गुपित उघड !

Milind Soman Fitness Secrets: वयाची साठी गाठली की अनेकजण विश्रांतीचा विचार करतात, पण अभिनेता, मॉडल मिलिंद सोमणसाठी वय हा केवळ एक आकडा आहे.

Milind Soman: 60 व्या वर्षी समुद्राला नमवलं! मिलिंद सोमणच्या 'सुपर फिट' राहण्याचं गुपित उघड !
Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमणच्या फिटनेसचं रहस्य माहिती आहे?
मुंबई:

Milind Soman Fitness Secrets: वयाची साठी गाठली की अनेकजण विश्रांतीचा विचार करतात, पण अभिनेता, मॉडल मिलिंद सोमणसाठी वय हा केवळ एक आकडा आहे. फिटनेसचा आयकॉन मानल्या जाणाऱ्या मिलिंदने नुकताच एक असा पराक्रम केला आहे, जो ऐकून तरुणही थक्क होतील. युरोपमधून पोहत थेट आफ्रिका खंड गाठण्याचे अचाट धाडस त्याने यशस्वी करून दाखवले आहे. 

1 मे 2026 रोजी त्याने जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार करत तब्बल 15 किलोमीटरचे अंतर पोहून कापले. स्पेनमधील टॅरिफा येथून सुरू झालेला त्याचा हा प्रवास मोरोक्कोच्या किनारपट्टीवर संपला. पाण्याचे प्रचंड तापमान आणि आव्हानात्मक लाटांचा सामना करत त्याने हा टप्पा गाठला आणि तिथे तिरंगा फडकवला.

अफाट ऊर्जेचे रहस्य काय?

मिलिंद सोमणच्या या अफाट ऊर्जेचे रहस्य त्याच्या महागड्या जिममध्ये नसून त्याच्या साध्या जीवनशैलीत दडलेले आहे. मिलिंद दररोज फक्त 10 ते 15 मिनिटेच व्यायाम करतो, पण त्यात कमालीचे सातत्य असते. लांब पल्ल्याचे धावणे, सायकलिंग आणि योगासने हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. 

कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट्स किंवा प्रथिने न घेता तो केवळ नैसर्गिक अन्नावर भर देतो. प्रक्रिया केलेले अन्न, पॅकेज्ड फूड आणि शीतपेये तो पूर्णपणे टाळतो. वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेचा अपवाद वगळता तो अल्कोहोलला स्पर्शही करत नाही. विशेष म्हणजे तो कधीही थंड पाणी पीत नाही.

( नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )

काय करतो नाश्ता आणि जेवण?

अनेकांना सकाळी उठल्यावर चहा किंवा बिस्किटे लागतात, पण मिलिंदची सकाळ ताजी आणि हंगामी फळे खाऊन सुरू होते. तो नाश्त्यात भरपूर फळे खातो. कधी एक-दोन अख्खी पपई, तर कधी अर्धा कलिंगड किंवा आंब्याच्या सिझनमध्ये मनसोक्त आंबे खाण्याला तो पसंती देतो. केळी हे देखील त्याच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचे फळ आहे.

त्याचे दुपारचे आणि रात्रीचे जेवण अगदी सामान्य भारतीय घरांसारखे असते. वरण, भात आणि भाजी हे त्याचे मुख्य अन्न आहे. मिलिंद कोणत्याही फॅन्सी सुपरफूडच्या मागे धावत नाही. रात्रीचे जेवण तो शक्यतो हलके ठेवतो आणि मांसाहार किंवा जड पदार्थ खाणे टाळतो, जेणेकरून अन्न पचायला सोपे जाईल.

Latest and Breaking News on NDTV

उपवासाचा प्रयोग आणि ऊर्जेचा नवा स्रोत

नोव्हेंबर 2024 मध्ये मिलिंदने केवळ कुतूहल म्हणून इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच ठराविक वेळेतच खाण्याचा प्रयोग सुरू केला होता. तो 16:8 या नियमाचे पालन करत होता, म्हणजे 16 तास काहीही न खाणे आणि 8 तासांच्या काळात जेवण करणे. 

या प्रयोगामुळे त्याचे 6 ते 7 किलो वजन कमी झाले आणि त्याला अधिक ताजेतवाने वाटू लागले. मात्र, हाफ-आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी अधिक कॅलरीची गरज असल्याने त्याने सध्या हा प्रयोग थांबवला असला, तरी त्याचे फायदे त्याला जाणवले आहेत.

झोपेचे वेळापत्रक आणि शिस्तबद्ध दिनचर्या

नेहमी असे म्हटले जाते की फिट राहण्यासाठी पहाटे लवकर उठावे लागते, पण मिलिंदचे गणित थोडे वेगळे आहे. तो सकाळी साधारण 8:30 वाजता उठतो आणि शांतपणे दिवसाची सुरुवात करतो. सकाळी 10 वाजता तो धावायला बाहेर पडतो. तो कधीही रात्री उशिरापर्यंत जागत नाही, पुरेशी झोप आणि विश्रांती हेच त्याच्या दीर्घकालीन फिटनेसचे खरे गमक आहे. निसर्गाशी जुळून राहिल्यास आणि साध्या सवयी अंगीकारल्यास वयाचे बंधन कधीच अडसर ठरत नाही, हेच मिलिंद सोमणच्या फिटनेसचं रहस्य आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com