अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील सावरपाटी तसेच परिसरातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावांमध्ये खारे पाणी प्यायल्याने अनेक नागरिकांना किडनीचे गंभीर आजार जडले आहेत. इतकेच नव्हे, तर अनेकांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर....
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खार पाणी प्याल तर होईल किडनी फेल हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे. अकोल्यात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघात 60 पेक्षा अधिक गावांत खार पाणी पिल्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झालेत इतकंच नव्हे तर अनेकांच्या किडनी फेल झाल्या आहेत. एक नव्हे, दोन नव्हे.. तर शेकडो जणांना खार पाणी प्यायलाने किडनीचे विकार उद्भवल्याने नागरिकही भयभीत झालेत.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावातले लोक विहिरी आणि बोअरमधलं क्षारयुक्त पाणी पित आहेत. या पाण्यामुळे गावात किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार वाढू लागलेत. सावरपाटी गावात तीन ते चार जणांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झालेत. तर प्रशांत काळे या ग्रामस्थाला किडनी गमावावी लागल्याची तक्रार आहे. त्यांना उपचारासाठी आतापर्यंत 12 लाखांच्या वर खर्च आला आहे.
( नक्की वाचा : Honey Trap : फेसबुकवरील मैत्रीची तार ISI पर्यंत पोहचली, पाकिस्तानला माहिती देणारा हेर अखेर सापडला! )
बाळापूर तालुक्यातल्या जवळपास 60 पेक्षा अधिक गावात हीच परिस्थिती आहे. इथलं पाणी क्षारयुक्त असल्यानं अनेकांना विविध आजार होत आहेत. गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागत आहे नाहीतर 15 ते 20 किलोमीटर दूर जाऊन दुसऱ्या गावातून पाणी आणावं लागत आहे. जिल्हा प्रशासनानंही आता बाळापूरमधल्या क्षारयुक्त पाण्याची गंभीर दखल घेतली आहे तसेच प्रशासनाने या गावात पाण्याची पाहणी करत पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत.
दरम्यान, यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. बाळापुर विधानसभा मतदारसंघामध्ये खेडी पाणीपुरवठा योजनेला लागला विलंब, त्याला शिंदे सरकारनं दिलेली स्थागिती त्यामुळेच गावातल्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच यावर लवकरच उपाययोजनांचं आश्वासन अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
Gujrat Fire: फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट! 18 कामगारांचा होरपळून मृत्यू; गुजरातमधील दुर्दैवी घटना