योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या आणि गोंधळाच्या प्रकरणाने आधीच लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावले आहे. या पेपरफुटीच्या संकटामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असताना, दुसऱ्या बाजूला गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. याच मोठ्या शैक्षणिक संकटाच्या आणि नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, अकोला जिल्ह्यातून मनाला चटका लावणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून डॉक्टर बनू पाहणाऱ्या एका तरुण आणि होतकरू विद्यार्थिनीने अखेर आर्थिक विवंचनेला आणि वाढत्या मानसिक तणावाला कंटाळून आपले जीवन संपवल्याचा खळबळजनक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला शहरात राहणारी भूमिका धबडघाव ही जीएनएम नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. अत्यंत हुशार असलेल्या भूमिकाला वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कमवायचे होते आणि तिने त्यासाठी नीटची परीक्षाही दिली होती. नीट परीक्षेनंतर पुन्हा एकदा चांगला अभ्यास करून डॉक्टर होण्याचे मोठे स्वप्न तिच्या डोळ्यांत होते.
( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात )
मात्र, देशात सध्या सुरू असलेल्या नीट पेपरफुटीच्या चक्रव्यूहामुळे आणि खासगी वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे डॉक्टर होणे अशक्य कोटीतील गोष्ट बनली आहे. नीट परीक्षेतील या गोंधळामुळे आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे भूमिकाने आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जड अंतःकरणाने बाजूला ठेवले होते. तिने नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला होता, जेणेकरून ती लवकर पायावर उभी राहून कुटुंबाला मदत करू शकेल.
आई-वडिलांचे अहोरात्र कष्ट आणि फी वाढीचा जाच
भूमिकाचे कुटुंब अत्यंत गरीब असून तिचे वडील एका ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर तिची आई लोकांकडे धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलीचे शिक्षणाचे स्वप्न भंगू नये म्हणून तिचे आई-वडील अहोरात्र कष्ट उपसत होते.
भूमिकाने नर्सिंगला प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती. मात्र, प्रवेश घेतल्यानंतर नंतरच्या काळात या शुल्कात सातत्याने वाढ करण्यात येत गेल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील हा मनमानी कारभार आणि वाढता खर्च पाहून भूमिका प्रचंड तणावाखाली आली होती.
( नक्की वाचा : Akola News: एका रात्रीत 2 बहिणींचे संपूर्ण जगच उद्ध्वस्त! अकोल्यात भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू )
आर्थिक विवंचनेतून अखेर टोकाचे पाऊल
आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या लहान भावाच्या भविष्याचा मोठा आर्थिक भार आई-वडिलांवर पडत आहे, ही चिंता भूमिकाला आतून पोखरत होती. एका बाजूला नीट परीक्षेतील गोंधळामुळे डॉक्टर होण्याच्या वाटा बंद झाल्या आणि दुसऱ्या बाजूला घेतलेल्या नर्सिंग शिक्षणाचा खर्चही पेलवेनासा झाला. घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्चामुळे भूमिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. याच तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क असताना, नीट पेपरफुटीसारखे प्रकार आणि आर्थिक अडचणींमुळे एखाद्या होतकरू मुलीला आपले आयुष्य संपवावे लागणे, ही संपूर्ण समाजासाठी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत चिंतेची आणि लाजिरवाणी बाब ठरली आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world