मनिष रक्षमवार
एक असं गाव ज्या गावात गेल्या 10 वर्षात दारूचा एक ही थेंब विकला गेला नाही. गावात कडक दारूबंदी पाळली गेली. काहींनी या काळात लपून दारू विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अशी अद्दल घडवण्यात आली, ज्यामुळे पुन्हा कुणी असं धाडस करण्याचा प्रयत्न ही केला नाही. गावकऱ्यांची ऐकी, आणि नियमांची कडक अंमलबजावणी यामुळे हे शक्य झालं आहे. हे गाव आहे गडचिरोली जिल्ह्यातील टिकेपल्ली. या गावाने इतर सर्व गावांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या पुढच्या काळात ही गावाची ही ओळख जपण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे.
गडचिरोली ह आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावठी किंवा मोहफुलाची दारू सर्वास भेटते. अवैध पद्धतीने दारू विकली जाते. टिकेपल्ली हे गाव ही त्यासाठी अपवाद नव्हते. गावात आठ ते दहा अवैध दारूची दुकानं होती. या दारूमुळे घराघरात वाद, भांडणं होत होती. तरुणी व्यसानाच्या आहारी जात होते. त्याच वेळी गावकऱ्यांनी दारू बंदीचा निर्णय घेतला. ग्रामसभा घेण्यात आली. त्यात ठराव करण्यात आला. 2015 सालची ही गोष्ट असेल. दारू बंदी कडक राबवण्यात येईल असा निर्णय झाला. जो या नियम मोडेल त्याला 40 हजाराचा दंड करण्यात येईल असं ही गावकऱ्यांनी ठरवलं.
गावकऱ्यांनी फक्त निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली. त्यात गावातील प्रतिष्ठीत लोकांचा समावेश करण्यात आला. या कमिटीवर नियमांची कडक अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली. मात्र तरी ही काही जणांनी गावात चोरून दारू विक्री सुरू ठेवली. ही बाब कमिटीच्या लक्षात आली. त्यांनी गांधीगिरी करत चोरून दारू विकणाऱ्याची संपूर्ण दारू जप्त केली. शिवाय त्याच्याकडून चाळीस हजार ही वसूल केले. ही कारवाई संपूर्ण गावा समोर करण्यात आली. दारू विक्रेत्याला चांगलीच अद्दल घडवण्यात आली. गावा समोर हा सर्व प्रकार झाल्याने तो एक प्रकार अपमानच झाला.
या धडक कारवाईचा इतर दारू विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला. कारवाईच्या भितीने त्यांनी दारू विक्री तात्काळ थांबवली. त्यानंतर गावात कधीच दारू विक्री झाली नाही. गेली 10 वर्षे ही दारू बंदी अविरत आणि यशस्वीपणे राबवली जात आहे. टिकेपल्ली गावात दारू शोधून ही सापडणार नाही अशी स्थिती आहे. ही बंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी एकजुट दाखवली. सर्वांचा सहभाग हे या दारूबंदीच्या यशचे कारण आहे. दारू पिणार नाही आणि पिऊ देणार नाही अशी भूमीका सर्वांची होती. गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना ‘मुक्तिपथ' तालुका संघटक रुपेश अंबादे व चमूतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते.