मनोज सातवी, विरार: विरार महानगरपालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. अनिल कुमार पवार यांची मनी लाँड्रीग प्रकरणी ED मार्फत त्यांच्या मालमत्तावर छापे टाकून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र अनिलकुमार पवार यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. अनिलकुमार पवार यांनी खासगी वाहन चालकाच्या चारही मुलांना महापालिकेत नोकरी दिल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विरार महानगरपालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा एक नवा कारनामा समोर आला आहे. अनिल पवार यांनी वाहनचालक मधुकर राऊत यांच्या चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
पवार यांचे खासगी वाहनचालक मधुकर राऊत यांचा पगार मनपाकडून मिळणाऱ्या वाहन भत्त्यातून होत असून, त्यांच्या मुलगा जितेन राऊत (ड्रायव्हर), मुलगी मानसी9uuo राऊत (लिपिक-टंकलेखक), तसेच, मुलगी अपर्णा वैती - राऊत आणि सृष्टी वैती - राऊत (शिपाई) म्हणुन महापालिकेत कार्यरत आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा पगार मनपाच्या निधीतून होत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या नियुक्त्या कोणतीही अधिकृत रिक्त पदांची जाहिरात न काढताच झाल्याचा आरोप आहे. शिवाय अधिक पात्र उमेदवारांना डावलून कमी पात्रता असलेल्यांना नोकरी दिल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणात माजी मनपा आयुक्तांसह ठेकेदार कंपनीवरही कारवाईची मागणी होत असून ईडीने या प्रकरणाची देखील चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी केली आहे.