- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलने सर्व १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे
- ७ जून रोजी मुंबई, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आणि नाशिक येथे मतदान पार पडले, १६९८ मतदारांनी मतदान केले
- समर्थ पॅनलचे नेते मेघराज भोसले यांनी विजयाबाबत आनंद व्यक्त केला आहे
विशाल पुजारी
बहुचर्चीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. दहा वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठी चित्रपट सृष्टी ही या निकालाकडे डोळे लावून होती. याला अखेर फुलस्टॉप मिळाला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीत पाहायला मिळाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये सर्व 14 जागांवर समर्थ पॅनलने विजय मिळवला आहे.
7 जून रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई, कोल्हापूर, पुणे, सोलापूर , नाशिक या केंद्रांवर मतदान झालं. 3404 मतदारां पैकी 1698 मतदारांनी मतदान केलं. त्यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर केंद्रावर झालं. सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यानंतर निकाल जाहीर झाला. यामध्ये मेघराज भोसले यांचं समर्थ पॅनल बहुमतानी निवडून आलं आहे. 17 पैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे एकूण 14 जागांसाठी ही निवडणूक झाली. समर्थ पॅनल विरुद्ध चित्रकर्मी पॅनल अशी ही निवडणूक पार पडली. यापैकी विरोधी गटातून निवडणूक लढलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर बिनविरोध निवडून आल्या तर उर्वरित सर्व विजयी उमेदवार हे समर्थ पॅनलचे आहेत.
अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणूक रणधुमाळीमध्ये या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र शिर्के यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन चित्रकर्मी पॅनलच्या वर्षा उसगावकर यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग रिकामा केला. तर समर्थ पॅनल कडून कंबर कसून तयारी केलेले मेघराज भोसले यांनी पाटकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र पाटकर यांनी केलेल्या आरोपानंतर यांनी निवडणुकीची चर्चा जोरात रंगली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ज माघारीपर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले होते. संकलन विभागातील विजय खोचीकर , संगीत क्षेत्रातून आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. उर्वरीत जागांसाठी निवडणूक झाली. त्याचा निकाल पुढील प्रमाणे.
समर्थ पॅनलचे विजयी उमेदवार
- मेघराज राजेभोसले (निर्माता)
- सुनील महाजन - निर्माता,
- दिपक कदम - (दिग्दर्शक)
- अजित शिरोळे ( दिग्दर्शक)
- राज काझी - (लेखक)
- सुशांत शेलार - (अभिनेता)
- धनाजी यमकर - (छायाचित्रण)
- शरद चव्हाण ( ध्वनीरेखक)
- रवी गावडे ( निर्मिती व्यवस्था)
- सुभाष नकाशे ( नृत्य दिग्दर्शक)
- प्रवीण (वासू )पाटील (कला दिग्दर्शक)
- चैत्राली डोंगरे (रंगभूषा/वेशभूषा)
- गणेश गारगोटे ( वितरण/प्रसिध्दी)
- विकास तोरणे ( कामगार)
या विजया नंतर समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराज भोसले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गेली दहा वर्ष आम्ही काम केले आहे. त्याचीच पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली. आमचे 16 उमेदवार निवडून आलेले आहेत. आमचे विजयी उमेदवार आणि नीलम शिर्के असे 17 जण यांना सोबत घेऊन काम करू. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला आम्ही उत्तर दिलं. अनेक खोट्या माहिती पोचवण्याचं काम या निवडणुकीत झालं. नीलम शिर्के यांना अभिनेत्री म्हणून आम्ही उमेदवारी दिलेली. कोणताही राजकीय हस्तक्षेप यामध्ये नव्हता. मतदारांनी विरोधी गटाला नाकारून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले असं ते म्हणाले.