ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Ambernath News : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड एजाज लकडावाला याची एन्ट्री झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.
पोलिसांना पाठवलेल्या पत्रात धक्कादायक दावे...
एजाज लकडावालाने ठाणे पोलीस आयुक्त आणि बदलापूर पोलिसांना पत्र पाठवून धक्कादायक दावे केले आहेत. या पत्रात त्याने आरोप केला आहे की, 2023 साली भाजप आमदार किसन कथोरे यांनी विश्वनाथ पनवेलकर यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कथोरे यांच्या काही सहकाऱ्यांनी त्याला कोर्टात भेटून सुपारी स्वीकारण्याची विनंती केल्याचा दावा देखील पत्रात करण्यात आला आहे.
लकडावालाच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवादही साधण्यात आला होता. मात्र, त्याने ही सुपारी स्वीकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी तयार असल्याचेही त्याने पत्रातून सांगितले असून, बदलापूर पोलिसांना यासंदर्भात तुरुंग प्रशासनाकडून पत्र मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या आधी स्वतः विश्वनाथ पनवेलकर यांनीही आमदार किसन कथोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळे या प्रकरणात राजकीय रंग अधिक गडद झाला आहे.
दुपारी अडीच वाजता झाडल्या गोळ्या...
हे प्रकरण एप्रिल 2025 मध्ये घडले होते. अंबरनाथमध्ये दुपारी सुमारे अडीच वाजता दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून येऊन पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर दोन गोळ्या झाडून पसार झाले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. एजाज लाकडावाला हा मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित कुख्यात गुन्हेगार मानला जातो. पूर्वी तो दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित होता, त्यानंतर तो छोटा राजनच्या गटाशी जोडला गेला. खंडणी, धमक्या आणि गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव वारंवार समोर आले आहे. 2020 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि सध्या त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या नव्या आरोपांमुळे अंबरनाथ गोळीबार प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे