राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेत उद्या (12 ऑगस्ट) अंगारकी चतुर्थीनिमित्त यात्रोत्सवाचं आयोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे 3.30 वाजता खुलं केलं जाणार आहे. अंगारकी यात्रोत्सवानिमित्त प्रारंभी मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते 'श्रीं'ची पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. पहाटे 3.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
अशी असेल भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था
श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झालं आहे. दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नारळबागेत 37 रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Angarki Sankashti Chaturthi 2025 Wishes: श्रद्धा-भक्तीचा शुभ दिवस! अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त पाठवा शुभेच्छा)
50 ते 60 हजार भाविक येण्याची शक्यता
गतवर्षीच्या अंगारकीला 25 हजारांपर्यंत भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला करण्यात आला होता. मात्र त्यापेक्षा जास्त जवळपास 50 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यावर्षी या अंगारकी चतुर्थीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने स्वयंभू 'श्रीं'च्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यांतून सुमार 50 ते 60 हजार भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी गणपतीपुळे येथील सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल आणि गणपतीपुळे खारभूमी मैदान या भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाकडूनही चोख नियोजन
या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली होती. अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार व प्रांतधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या बैठकीत गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या विविध ठिकाणच्या भाविकांना दर्शनाची व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था अतिशय सुरळीतरित्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग व अन्य सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आपापल्या कामांची दखल घेऊन सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण करावीत. तसेच येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय उद्भवणार नाही, या दृष्टीने चोख नियोजन करावे अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या.
(नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2025 Wishes: मोदकाप्रमाणे तुमचे जीवन गोड आणि चंद्रासारखं तेजस्वी व्हावं! संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा)
समुद्रकिनाऱ्याजवळ विशेष काळजी
मंदिराला लागूनच समुद्र आहे, त्यामुळे मौजमजा करण्यासाठी अनेक जण समुद्रात जात असतात. मात्र खवळलेल्या समुद्राची सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना सूचना मिळाव्यात यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि सर्व यंत्रणांच्या वतीने परिसरात माहिती फलक लावण्यात आले आहेत.. तसेच समुद्राची असलेली धोक्याची स्थिती लक्षात घेऊन समुद्रकिनारी विशेष गस्त घालण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक व अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहे.