राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेलवकर यांना एका पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या पार्टीमध्ये अंमली पदार्थ होते आणि त्यांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी खडसे यांनी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यासह एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेच्यावेळी काही अज्ञात माणसे आत शिरली होती आणि ती साध्या वेशातील पोलीस होते असा आरोप खडसे यांनी केला होता. खडसे यांच्या याच दाव्याचा आधार घेत अंजली दमानिया यांनी X वर एक पोस्ट केली असून त्यांनी खडसे यांना काही गोष्टींची आठवण करून देण्याचा प्रयत्न केलाय.
एकनाथ खडसे यांनी काय म्हटले होते?
एकनाथ खडसे यांनी X वर पोस्ट करत म्हटले होते की, "आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचे पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिले.
या माणसांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. तब्बल १०-१२ लोक ?(हेडकॉन्स्टेबल दिपक कांबळे, चंद्रकांत रेजीतवाड, पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नावे आहेत) या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनी कबूल केले की त्यांनीच ही माणसं पाठवली.
( नक्की वाचा: खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते! )
हे जगदाळे कोण ? त्यांची ही माणसं माझ्या मुलीच्या घरात अशीच कशी शिरतात ? त्यांना कुणी परवानगी दिली ? या लोकांचा हेतू काय ? या जगदाळेंचा बॉस कोण आहे ? कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली होती ? याचे उत्तर आम्हाला हवे आहे.
माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे. माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड रहायचे आहे का ? असा प्रश्न मला पडतो आहे.
माझ्या 35- 40 वर्षांच्या संसदीय कारकीर्देत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही."
खडसे, आता कळेल तुम्हाला!
अंजली दमानिया यांनी खडसेंच्या पोस्टवर व्यक्त होताना म्हटले आहे की, "श्री खडसेजी , हे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण आहे ह्यात काहीच शंका नाही. तुमच्या सारख्या लोकांविरुद्ध लढून सुद्धा, मी जे खरं आहे तेच बोलते.
खडसे तुम्ही स्वतः, मला आणि माझ्या कुटुंबाला, किती छळालं ते आठवा.
४ खोट्या FIR , ३२ डिफेमेशन केसेस, ट्रेन मधे माझा फ़ोन नंबर लावणे, दावूद च्या नावाने मला धमकीचा फोन करवणे, लढा सोडून देण्याची धमकी देणे…. काय काय नाही केलेत.
(नक्की वाचा: रिअल इस्टेटचा व्यवसाय, स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी; पुण्यात रेव्ह पार्टीत सापडलेले एकनाथ खडसेंचे जावई कोण आहेत? )
वाईट एवढच वाटतंय की रोहिणीला व तिच्या नवऱ्याला भोगावं लागलं.
आज तुम्हाला परमेश्वराने धडा शिकवला. खोट्या FIR चा किती त्रास होतो ते आता कळेल तुम्हाला. "