योगेश लाठकर, नांदेड
नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेला एक तालुका म्हणजे देगलूर तालुका. हा तालुका तेलंगणा आणि कर्नाटक अशा दोन राज्यांच्या सीमेला जोडला आहे. याच देगलूर शहराच्या मुख्यालयापासून अगदी 30 किमी अंतरावर होट्टल हे गाव वसलेले आहे. सीमेवरील गाव असल्याने इथल्या मराठी भाषेत दाक्षिणात्य शब्दांची लय दिसते. हे गाव इथल्या दगडांवरील कोरीव कामांमुळे चर्चेत असते. चालुक्य राजाच्या काळात सध्याचे होट्टल हे राजधानीचे शहर होते, असे सांगितले जाते. याच गावात महाराष्ट्रातील एक अनोख प्रयोग झाला.
प्राचीन मंदिरासाठी अनोखा प्रयोग
एखादे अतिपुरातन मंदिर आहे त्या जागेवरून बाजूला करून तेथील मूळ जागा स्वच्छ करून पुन्हा एकदा त्याच जागेवर मंदिर उभे केले. हा प्रकार तुम्हाला स्वप्नवत वाटेल, पण नांदेड जिल्ह्यामध्ये असा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल येथे अकराव्या शतकातील चालुक्यकालीन मंदिर आहे. हे मंदिर अतिशय भग्नावस्थेत होते. मंदिराची पूर्ण पडझड झाली होती. पण ईंटेक आणि राज्य शासनाने अनोख्या पद्धतीने मंदिराला पुन्हा एकदा त्याचे गतवैभव प्राप्त करून दिले आहे.
(टेंड्रिंग न्यूज: लाल साडी अन् डोक्यावर लाल कॅप...; महाराष्ट्रातील 'या' गावात महिलांची रात्रभर गस्त, कारण काय?)
अकराव्या शतकातील अप्रतिम केलेचे दर्शन
नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा आंध्र प्रदेश, कर्नाटक अन् महाराष्ट्र सीमेवरील तालुका. येथून 30 किलोमीटर अंतरावर होट्टल हे छोटेसे गाव आहे. ई.स. अकराव्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांचा प्रभाव नांदेडवर जसा आहे, तसाच तो होट्टलवर देखील पाहावयास मिळतो. पूर्वी या होट्टलचे नाव पोट्टलनगरी असे होते. इथे 300 वर्षातील म्हणजे 11,12 आणि 13 व्या शतकातील तीन शिलालेख आढळले. त्याच काळातील अप्रतिम कलाविश्कार इथल्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कलादालनातून पाहायला मिळतो. येथे देवीदेवतांच्या मूर्तीबरोबर सामान्यांचीही अप्रतिम कलेचे दर्शन घडते. शिल्पकाराच्या कलेपुढे नतमस्तक व्हावे, अशी एकापेक्षा एक सरस मूर्तीशिल्प येथे आजही पाहावयास मिळतात. नृत्य साधना करून शांत झालेली नर्तिका, स्वत:च्या सौंदर्य प्रसाधनात मग्न झालेली रूपगर्विता, नृत्य अभिनिवेशात उभा असलेला श्रीगणेश अशी अनेक शिल्प येथे पाहावयास मिळतात. पण तब्बल 40 वर्षांपासून येथे हे कलावैभव भग्नावस्थेत होते. दरम्यान या कलात्मक मंदिराचा निम्मा भाग पडला होता. अनेक शिल्पांमध्ये रोप उगवले होते. त्यामुळे हे कलावैभव कुणालाही पाहता येत नव्हते. अतिशय वाईट अवस्थेत हे शिल्प अंतिम श्वास घेत होते. पण इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज या संस्थेचे सचिव सुरेश जोंधळे यांनी या कलवैभवाला पुनर्जन्म देण्याचा संकल्प केला अन् त्यासाठी शासनाकडे पाठपुरावाही केला.
मंदिर जतन करण्यासाठी सातत्याने केला पाठपुरावा
हे मंदिर निम्मे पडलेले होते, तर याचा बहुतांश भाग हा भग्नावस्थेत होता. पण ईंटेक संस्थेने राज्य शासनकडे सातत्याने पाठपुरावा केला. याद्वारे मंदिराच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये उपलब्ध झाले, पण हे मंदिर उभे कसे करावे? हा प्रश्न सतावत होता. यातून एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. या मंदिराच्या सर्व दगडांना क्रमांक देण्यात आले. यानंतर संपूर्ण मंदिरामध्ये माती भरण्यात आली. त्यानंतर एक-एक दगड अलगद काढण्यात आला, अन् मंदिराचा मुख्य भाग पूर्णपणे मोकळा करण्यात आला. हा भाग मोकळा झाल्यानंतर येथील संपूर्ण जागा स्वच्छ करण्यात आली. दगडांमध्ये उगवलेले रोप-झाडे काढण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर क्रमांकानुसार सर्व दगडांची पुन्हा त्याच पद्धतीने मांडणी करण्यात आला. या प्रक्रियेमुळे तब्बल तीन वर्षांच्या परिश्रमानंतर होट्टल मंदिर अकराव्या शतकामध्ये जसे होते तसेच रूप पुन्हा या मंदिराला नव्याने मिळाले.
प्राचीन मंदिराचे नवे रूप
होट्टलच्या मुख्य मंदिराशेजारी अकराव्या शतकातील आणखी काही पुरातन वास्तू आहेत. या वास्तूंचंही गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीचे काम सुरू आहे. दररोज अनेक कामगार इथे दिवसरात्र काम करत आहेत. लवकरच या वास्तूंनाही नवे रूप मिळेल. भावी पिढीला आपल्या पूर्वजांनी काय-काय केले आहे? आपली संस्कृती काय आहे? हे आपण गर्वाने दाखवू शकतो. होट्टलच्या मंदिराचे काम हे राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे पुरातन शिल्प शेवटच्या घटिका मोजत आहेत. तिथेही शासनाने असेच प्रयत्न केल्यास पुढील अनेक वर्षे आपली संस्कृती दिमाखात उभी राहील. संभाजी नगर येथील वेरूळ महोत्सवाच्या धर्तीवर आता होट्टल इथे दरवर्षी होट्टल महोत्सव साजरा केला जातो. नामवंत कलावंत या उत्सावास हजेरी लावतात. येथील कला पर्यटकांना पाहता यावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे.