संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News : नागपुरच्या एका वस्तीच्या नावावरुन नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. नागपुरच्या नाईक तलाव लगतच्या एका वस्तीचं नाव बदलण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. त्यामागील कारणंही तसंच आहे. चारशे वर्षांपूर्वी शेक्सपियरने एका नाटकात "नावात काय आहे?" असा सवाल केला होता. नागपुरच्या एका वस्तीतील लोकांना हा प्रश्न विचाराल तर ते सांगतील 'नावात खूप अडचणी आहेत..'. नागपुरच्या नाईक तलाव परिसरात वस्तीच्या नावावरून सध्या पोस्टरबाजी सुरू आहे. वस्तीतील लोकांना आता वस्तीचे नाव बदलून हवं आहे. कारण या वस्तीचे नाव आहे बांगलादेश (Bangladesh Migrant). हे नाव कसं पडलं आणि नागरिकांना ते कां बदलून हवे आहे, यामागे सबळ कारणं देखील आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इतिहास असा आहे, की 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा नवीन देश अस्तित्वात आला. तेव्हा काही कामगार नेत्यांनी नाईकवाडी या वस्तीचे नामकरण केलं आणि बांगलादेश असं नाव ठेवलं. मात्र, आता हे नाव हीच मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात बांगलादेश येथून आलेल्या घुसखोरांच्या विरोधात तपासणी मोहीम सुरू असताना वस्तीचं नाव आता वस्तीतील लोकांपुढे संकट म्हणून उभं ठाकलं आहे. आमच्या वस्तीचा आणि बांगलादेशाचा काहीही संबंध नाही. पण आता नोकरी आणि विवाहात समस्या उत्पन्न होत आहेत. लग्न होण्यात आणि नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत. आता हे नाव नकोच!" असं कृती समिती सदस्य सचिन बिसेन यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितलं.
नक्की वाचा - Nagpur News : आता दुचाकीमध्ये ठेवता येणार दोघांचे हेल्मेट, नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांची निर्मिती
गेली चाळीस वर्षे इथे राहणारे सी रेड्डी यांनी सैन्यात नोकरीसाठी आवेदन केलं होतं. तेव्हा अर्जावरील पत्त्यावर वस्तीचं नाव पाहून त्यांना कित्येक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सैन्यात नोकरी मिळाली नाही, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. काही वर्षांपूर्वी येथे एटीएसची कारवाई झाली होती. तेव्हा बांगलादेश येथून आलेले काही घुसखोर सापडले होते.
त्यावेळी वस्तीतील लोकांना वस्तीच्या नावामुळे नवा धोका निर्माण झाल्याची जाणीव झाली. बांगलादेश हे नाव पाहून काही घुसखोर येथे अवैध झोपडी टाकून राहू लागल्याचे समोर आले होते. आजही आमच्या वस्तीचं नाव घेतलं तर लोक संशयाने पाहतात किंवा टिंगल टवाळी करतात. आम्ही चिंतेचा आणि चेष्टेचा विषय झालो अशी खंत अन्य एका नागरिकाने व्यक्त केली.