Ashadhi Wari 2025: बैलजोडीचा मान देण्याची परंपरा खंडीत! आषाढी वारीआधी देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय

बैलजोडी साठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आला आहे. 18 जूनला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे. त्याआधी देहू संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थान नव्या बैलजोड्या  खरेदी करणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान  देण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी देहू संस्थानच्या तयारीला वेग आला आहे. यावर्षी देहू संस्थांनकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूर ला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोडयांना हा मान दिला जायचा.

परंतु यावर्षी पासून देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पासून बैलजोडी साठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत. 

नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार

दरम्यान, 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांचे तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान आहे. यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान रस्त्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवीन पालखी मार्ग हा मोठा झाल्याने त्या मार्गावर वारकऱ्यांना सावलीसाठी झाडे नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्षारोपण करून येणाऱ्या पुढील काही वर्षात याची मोठी डेरेदार झाडे तयार होतील आणि वारकऱ्यांना भविष्यात सावली निर्माण होईल असा निर्धार या वारी सोहळ्यात देहू संस्थानकडून करण्यात आला आहे.

Advertisement