Ashadhi Wari 2026: जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी मध्ये पार पडलं आहे. सर्वप्रथम जगद्गुरु तुकोबारायांची पालखी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाली, अगोदर अश्वाला रिंगण दाखवण्यात आले. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली.रिंगणात सर्वात पहिल्यांदा विणेकरी धावले,तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला धावल्या.
टाळकरी, पकवाजे धावले त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि शासकीय अधिकारी यांनी ही रिंगण पूर्ण केले. आणि मग यानंतर मानाचे अश्व धावले. बाबुळगावकरांचा अश्व पुढे धावत असतो त्यावरती स्वतः तुकोबाराय रूढ झालेले असतात, अशी वारकऱ्यांची भावना आहे. त्याच्या पाठीमागे मोहिते पाटलांचा अश्व धावतो त्यावरती चोपदार बसलेला असतो. ज्यावेळी तीन फेऱ्या पूर्ण होतात आणि रिंगण पूर्ण झाले.
वारीतील भावस्पर्शी क्षण, रिंगण सोहळ्याचे महत्त्व काय?
वारीतील सर्वात भावस्पर्शी आणि महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण. मोठ्या मोकळ्या मैदानात वारीतील रिंगण सोहळा पार पडतो. रिंगण जेव्हा सुरु होते तेव्हा मध्यभागी पालखी असते व पालखीच्या आजूबाजूला वारकरी व दिंड्या असतात. या रिंगण सोहळ्यात संतांच्या पालखीच्या सानिध्यात असलेल्या अश्वाला गोलाकार मैदानात फिरवले जाते. या सोहळ्यात एक किंवा दोन अश्व धावत असतात.
यापैकी एका अश्वावर भगवा पताका घेतलेला एक वारकरी असतो तर दुसऱ्या अश्वावर कोणीही बसलेले नसते. हा मानाचा घोडा म्हणजे संतांच्या अदृश्य उपस्थितीचे प्रतिक असून त्यावर संत बसून ते घोडा धावताना वारकऱ्यांना आशीर्वाद देतात अशी भावना आहे. म्हणूनच अश्व धावल्यानंतर त्याच्या टापांखालची माती पवित्र मानून वारकरी मस्तकाला लावतात. ही माती संतांच्या चरणस्पर्शाने पावन झाल्याची भावना आहे. या रिंगण सोहळ्यावेळी वारकरी ज्ञानोबा तिकोबाचा गजर करतात, हरिनामाचा जयघोष केला जातो. हा रिंगण सोहळा म्हणजे शिस्त, भक्ती अन् समृद्ध परंपरेचे प्रतिक आहे.
दरम्यान,जवळपास 200 किलोमीटर हुन अधिकचा प्रवास वारकरी देहूपासून पंढरीपर्यंत पायी चालत करत असतात. चालून चालून आलेला थकवा दूर करण्यासाठी आणि वारकऱ्यांमध्ये एक उत्साह निर्माण होण्यासाठी म्हणून हा रिंगण सोहळा पार पडत असतो, अशीही या मागची भावना आहे. म्हणूनच या नेत्रदीपक सोहळ्याचे अनेकांना वेध लागलेले असतात.