संकेत कुलकर्णी
महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. लाखो वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 'आषाढी वारी' करत पंढरपूरला जातात. लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेतात. नुकत्याच झालेल्या आषाढी वारीमध्ये विठ्ठलाला तब्बल दहा कोटी 84 लाखाचे दान आले आहे. यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर , कुंडीपेटी तसेच सोने-चांदीच्या माध्यमातून वारकरी भक्तांनी भरभरून दान दिले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटी 35 लाखाचे वाढीव दान मिळाले. त्यामुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाची श्रीमंती वाढली.
किती दान झाले जमा?
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर प्रशासनाने केल्या होत्या. परिणामी भाविकांनी जलददर्शन घेत विठ्ठल चरणी दानही दिले. आषाढ शुध्द 01 (दिनांक 26 जून) ते आषाढ शुध्द 15 (दिनांक 10 जुलै) या कालावधीत विविध मार्गांनी जमा झालेली रक्कम खालील प्रमाणे आहे.
- श्रींच्या चरणी अर्पण झालेली रक्कम- 7,50,5291 रुपये
- देणगीतून आलेली रक्कम - 2,88,33,569 रुपये
- लाडू प्रसाद विक्री- 9,40,4340 रुपये
- भक्तनिवास- 4,54,1458 रुपये
- हुंडीपेटी-14,47,1348 रुपये
- परिवार देवता- 3,24,5682 रूपये
- सोने-चांदी अर्पण- 2,59,61,768 रुपये
- अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर इत्यादी- 1,24,5075 रुपये
- 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बस - 32 लाख रुपये
( नक्की वाचा : Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन )
2024 च्या आषाढी यात्रेत 8 कोटी 48 लाख 58 हजार 560 रुपये आले होते. या वर्षीच्या यात्रेत विविध मार्गांनी आलेली रक्कम वाढून 10 कोटी 84लाख 08 हजार 531 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 2024 च्या आषाढी वारीच्या तुलनेत यंदाच्या आषाढी वारीमध्ये 2 कोटी 35 लाख 49 हजार 971 रुपयांनी वाढ झाली आहे. या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.