Ashok Kharat Case Jitendra Shelke Accident Mystetry: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. अशोक खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर शेळके यांची कार आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला. ज्यामध्ये जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या अपघातावरुन आता संशय व्यक्त केला जात आहे.
हा अपघात नव्हे घातपात.. सुषमा अंधारेंचा संशय
"अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी खरातच्या जिवाला धोका असू शकतो या असं म्हटलं. या शक्यतेला आजच्या घटनेने जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं आहे. खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नये असा कट असावा. मात्र तरीही एसआयटी अजूनही तपासाचा वेग वाढवत नाही. आजची घटना मात्र एकूण तपास यंत्रणा आणि शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
अंजली दमानियांची मोठी मागणी
"मला अतिशय मोठा धक्का बसला आहे. ही आता सुरुवात झाली आहे, ज्या मोठ्या गोष्टी घडतात त्यामधील सुत्रधारांना एक एक करुन संपवलं जाते. जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांचे भाऊ खरातच्या अतिशय जवळचे होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची इडीकडून चौकशी झाली होती, त्यानंतर अशी घटना घडणे संशयास्पद आहे. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार आहेत त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी करत जितेंद्र शेळके यांची बरीचशी चौकशी झाली होती, मात्र बाकीची माहिती समोर येऊ नये म्हणून हा अपघात झाला आहे का?" असा संशय अंजली दमानियांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन संशयास्पद आहे. १७ मार्चला अशोक खरातला गुन्हा दाखल झाला, आज १७ एप्रिल आहे. बरोबर एक महिना आज पूर्ण होतोय. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर काम करत होते. याप्रकरणात अनेक नेते, उद्योजक अधिकाऱ्यांची नावे समोर येणार होती. अनेकांची पदे जाणार होती त्यामुळे शेळकेंना संपवण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणातील इतर साक्षीदारांना संरक्षण द्यावं, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे.