मनोज जरांगे पाटील मैदानात, बीड जिल्ह्यात कुणाची वाढवणार डोकेदुखी

Manoj Jarange Patil :  या बैठका मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरी घेण्यात येणार असल्या तरी जिल्ह्यातील विधानसभा असलेल्या मुख्य सहा गावातच या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील,बीड

 Manoj Jarange Patil :  मराठा नेते मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातल्या  विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठक घेणार आहेत. या बैठकांची सुरुवात गुरुवारपासून (5 सप्टेंबर) होणार आहे.  गेवराई, माजलगाव, परळी, केज,बीड,आष्टी-पाटोदा अशा अनुक्रमे या घोंगडी बैठका होणार आहेत. या बैठका मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरी घेण्यात येणार असल्या तरी जिल्ह्यातील विधानसभा असलेल्या मुख्य सहा गावातच या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी जरांगेंची भेट घेतली होती. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसं आहे वेळापत्रक?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत काय बोलणार याबद्दलही सर्वांना उत्सुकता आहे.असून उद्या 5 सप्टेंबर रोजी पहिली बैठक गेवराई मतदार संघात आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर माजलगाव येथे 6 सप्टेंबर ला ही बैठक असणार आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळी येथे 8 तारखेला ही बैठक आयोजित केली गेली असून याच दिवशी केज मतदार संघातही बैठक असणार आहे. बीड विधानसभा मतदार संघातील घोंगडी बैठक ही 9 तारखेला होणार असून 13 सप्टेंबर रोजी आष्टी - पाटोदा मतदार संघात ही बैठक असणार आहे. 

( नक्की वाचा : 'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? )

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीचे मोठे नुकसान झाले. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवातही हा फॅक्टर निर्णायक ठरला होता. यामुळे या घोंगडी बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीनंतर कुणाची डोकेदुखी वाढणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल