विष्णू बुरगे, प्रतिनिधी
Ausa Nagar Parishad 2025 Election Result : लातूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या औसा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन शेख यांनी 600 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला आहे.
भाजपासाठी मोठा राजकीय धक्का
हा निकाल भाजपसाठी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. औसामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती मैदानात उतरली होती, मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या झंझावातासमोर यश मिळवता आले नाही. आजी-माजी आमदार सोबतीला असूनही भाजपला या नगरपरिषदेत आपले कमळ फुलवता आले नाही, ही सध्या जिल्ह्यात चर्चेची बाब ठरली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश )
जागांचे संख्याबळ आणि राजकीय गणित
औसा नगरपरिषदेच्या एकूण 23 जागांसाठी हे मतदान पार पडले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तब्बल 17 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्ष पदासह बहुतांश जागा जिंकल्यामुळे आता पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
भाजपची ताकद वाढूनही पराभव
अभिमन्यू पवार हे 2019 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच, यापूर्वी दोन वेळा आमदार राहिलेले बसवराज पाटील यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हे दोन्ही मोठे नेते एकाच पक्षात असल्याने भाजपची ताकद प्रचंड वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. तरीही स्थानिक मतदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि आनंदोत्सव
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी औसा शहरात विजयी मिरवणूक काढली. परवीन शेख यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. लातूर जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे मनोबल उंचावले असून, आगामी निवडणुकांसाठी हे निकाल निर्णायक ठरू शकतात असे बोलले जात आहे.