जाहिरात

Pune News : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश

Pune Municipal Corporation Elections 2026 : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Pune News  : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश
Pune Municipal Corporation Elections 2026 : भाजपाच्या 'ऑपरेशन लोटस' ची गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या राजकारणात चर्चा होती.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी 

Pune Municipal Corporation Elections 2026 : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शनिवारी ( 20 डिसेंबर 2025) जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपाच्या 'ऑपरेशन लोटस' ची गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या राजकारणात चर्चा होती. या चर्चांना शनिवारी पूर्णविराम मिळाला. पुण्यातील तब्बल 11 दिग्गज आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (20 डिसेंबर) मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून पुण्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी

आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे यापूर्वीच जवळपास 2500 उमेदवारी अर्ज वाटण्यात आले होते. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यानंतर आता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. 

मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. पुणे शहरातून निवडून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पक्षात स्थान देऊन भाजपाने स्वत:ची बाजू अधिक भक्कम केली आहे.

( नक्की वाचा : Ambernath Nagarparishad Election 2025: लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय? )

मुख्यमंत्र्यांच्या रणनीतीला यश

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी इनकमिंगबाबत सूचक वक्तव्य केले होते.  ताकदवान उमेदवार पक्षात येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे आणि विजयाची खात्री हाच मुख्य निकष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

फडणवीसांच्या याच रणनीतीनुसार भाजपने पुण्यात आपले जाळे विणले आणि आज 11 महत्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

( नक्की वाचा : Shalinitai Patil : राजकारणातील 'क्रांतिसेना' शांत; माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन )
 

शरद पवार गटाला धक्का

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नावांमध्ये काही नावे अत्यंत धक्कादायक मानली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानले जाणारे माजी नगरसेवक सचिन दोडके यांचा समावेश आहे. 

याशिवाय विकास दांगट, सायली वांजळे, बाळा धनकवडे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, सतिश लोंढे, खंडू लोंढे, प्रतिभा चोरगे आणि पायल तुपे यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले आहे. या बड्या नेत्यांच्या जाण्यामुळे शरद पवार गटाला पुण्यात मोठे खिंडार पडले आहे.

निष्ठवंतांची नाराजी आणि बंडखोरीचे सावट

एकीकडे मोठ्या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढत असल्याचे दिसत असले तरी, दुसरीकडे पक्षात जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. जे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहेत, त्यांना डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी दिली गेली, तर पक्षात बंडखोरी होऊ शकते. नाराज झालेले इच्छुक वेगळा मार्ग निवडतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या मेगा इनकमिंगमुळे आगामी निवडणुका अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com