समाधान कांबळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 9 जुलै रोजी मध्यरात्री या संपूर्ण परिसराला भूकंपाच्या लागोपाठ 3 ते 4 तीव्र धक्क्यांनी हादरवून सोडले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेले हे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसमत तालुका आणि हिंगोली शहर पुन्हा हादरले
आज सकाळी 11.26 वाजता आलेल्या 3.5 तीव्रतेच्या भूकंपाचा मुख्य प्रभाव वसमत तालुक्यातील शिरळी, पांगरा आणि शिंदे परिसरात जाणवला. या ग्रामीण भागातील घरांना आणि जमिनीला बसलेले हादरे एवढे स्पष्ट होते की, नागरिक तातडीने घराबाहेर मोकळ्या जागेत पळाले. वसमत तालुक्यासोबतच हिंगोली शहरातही अनेकांना हा धक्का जाणवला असून, ऐन कामाच्या वेळेत हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
9 जुलैच्या मध्यरात्री लागोपाठ 3 ते 4 हादरे
या भूकंपाची पार्श्वभूमी पाहता, 9 जुलै रोजी मध्यरात्री हिंगोली आणि शेजारील नांदेड, परभणी जिल्ह्याला निसर्गाचा मोठा तडाखा बसला होता. मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना लागोपाठ 3 ते 4 तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. यापूर्वी 2 जुलै रोजी या भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच 9 जुलैची मध्यरात्र आणि आता 11 जुलै रोजी सकाळी पुन्हा धक्का बसल्यामुळे भूगर्भात काही मोठे बदल होत आहेत का, अशी भीती परिसरातील नागरिकांना सतावत आहे.
(नक्की वाचा- Satara News: पुण्यातील पर्यटकाची पाचगणीत अमानुष मारहाण करत हत्या; तरुणांचं नेमकं काय चुकलं?)
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता भूकंप जाणवल्यास तात्काळ सुरक्षित आणि उघड्या मैदानावर यावे, असे आवाहन केले आहे.