- पंढरपूरमधील मुस्लिम बांधवांनी आजच्या बकरी ईदला कुर्बानी व नमाज न करण्याचा निर्णय घेतला आहे
- पुरुषोत्तम अधिकमासातील एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
- विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम बांधवांनी पंढरपूरमध्ये मांस वर्ज्य असल्यामुळे ईद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे
संकेत कुलकर्णी
बकरी ईद आज बुधवारी संपूर्ण देशात साजरी केली जात आहे. या निमित्ताने नमाज आणि कुर्बानी दिली जात आहे. असं असलं तरी एक शहर असं आहे ज्या ठिकाणी आज बकरी ईद असली तरी ती साजरी केली जाणार नाही. त्यामुळे ना कुर्बानी ना नमाज पठण. त्याला कारण ही तसेच आहे. ते म्हणजे एकादशी. त्यामुळे पंढरपूरमधील मुस्लिम बांधव आज बकरी ईद साजरी करणार नाहीत. ही परंपरा वर्षोनी वर्षे पाळली जात असल्याचे मुस्लिम बांधव सांगत आहे. आजच्या ऐवजी उद्या किंवा परवा ईद साजरी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुरुषोत्तम अधिकमासातील एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात साजरा होत आहे. तसेच आज बकरी ईद देखील आहे. त्यामुळे पंढरपूर मधील मुस्लिम धर्मीय नागरिकांनी बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिवाय ईदची नमाज ही पडली जाणार नाही. पंढरपुरात वारकरी सांप्रदायाला मांस वर्ज्य आहे. त्यामुळेच विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम धर्मीय बांधवांनी आजची बकरी ईद उद्या किंवा परवा साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आमची पांडुरंगावर श्रद्ध आहे. लाखो लोक अधिक मासात पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येत असतात. हे एक तिर्थक्षेत्र आहे. त्यात एकादशी आली आहे. त्यामुळे अशा स्थितीत कुर्बानी देणे योग्य नाही. यापूर्वी ही ज्या ज्यावेळी एकादशी आणि ईद एकत्र आली त्यावेळी कुर्बानी आणि नमाज पठण केलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही ही एकादशी पाळणार असल्याचं मुस्लिम बांधवांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं कौतूक होत आहे. आमच्या मना मनात पांडूरंग असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
ही बकरी ईद आता पंढरपूरातील मुस्लिम बांधव उद्या किंवा परवा साजरी करतील. देशभरात ईद साजरी होत आहे. त्यासाठी कुर्बानी दिली जाते. कुर्बानी देण्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वातावरण तापलं आहे. मुंबईतल्या मिरारोडमध्ये ही असचं एक प्रकरण समोर आलं. दोन समाजातील लोक एकमेका समोर ठाकले होते. काही ठिकाणी हातपायी ही झाली. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे पंढरपूरमध्ये मात्र भिन्न चित्र पहायला मिळत आहे. इथं मुस्लिम समाजाने स्वत: पुढे येत एकादशीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world