वांद्रे पूर्व मतदारसंघाला (Bandra East Vidhan Sabha) बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. आतापर्यत येथून सहा जणांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे महायुतीमधील बंडखोर उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा इशारा दिला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी अर्ज भरला असून महायुतीतून अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी मैदानात उतरले आहेत. तर वरून सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे सचिन सावंत नाराज झाले होते. त्यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी ट्विट करीत यावर नाराजी व्यक्त केली आणि वांद्रे पूर्वेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं.
शिवसेना शिंदे गटाकडून विभाग अध्यक्ष कुणाल सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात कुठल्याच पक्षाने स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले नसल्याने कुणाल सरमळकर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. त्याशिवाय त्यांनी यापूर्वी वांद्रे पूर्वेतून इच्छुक असल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र ऐनवेळी झिशान सिद्दीकी यांना महायुतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुणाल सरमळकरांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं.
नक्की वाचा - Vidhan Sabha Election : शरद पवार गटाची पाचवी यादी जाहीर, 288 पैकी किती जागांवर लढणार?
दुसरीकडे भाजपाच्या तृप्ती सावंत मनसेकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढणार आहे. काल उशीरा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र भाजपाकडून उमेदवारी मिळू शकणार नसल्याने मनसेकडून लढणार आहे. यापूर्वी दे़खील तृप्ती सावंत यांनी बंड केले होते. मात्र यामुळे मनसेकडून इच्छूक असलेल्या अखिल चित्रेंचा पत्ता कट झाला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मनसेकडून उमेदवारी न मिळाल्याने मनसेला ते जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंचे निष्ठावान म्हणून अखिल यांची ओळख आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उमेदवाराने बंडाची तलवार हाती घेतली आहे.