स्वानंद पाटील, बीड
बीड जिल्ह्यातील परळीची ओळख ही पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथामुळे आहेच. याच शहरातील गेल्या तीन पिढ्यांपासून शहरातील अंबेवेस भागात असलेल्या सावजी पेढ्याने चव आणि दर्जाच्या आधारे आपली ओळख निर्माण केली आहे. पेढा जीव झाला वेडा ही म्हण प्रचलित आहे. या म्हणीचे प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर परळीतल्या सावजी पेढ्याची चव नक्कीच चाखलीच पाहिजे.
एकदा या पेढ्याच्या आस्वाद घेतल्यांनंतर जीभेवर या पेढ्याची चव रेंगाळल्याने याची मधुरता अधिकाधिक जाणवते. धार्मिक कार्य असोत किंवा उद्घाटन समारंभ, आनंदच्या क्षणात बीडच्या परळी वैजनाथ येथील सावजी पेढा पंचक्रोशीतच नाही तर जिल्ह्यासह सर्वदूर प्रसिद्ध आहे. मुस्लिम बांधवही हे पेढे दुबईपर्यंत घेऊन जातात. राजकारणातील दिग्गजांनीही या पेढ्याचा आस्वाद घेतलेला आहे.
(नक्की वाचा: Hottal Temple आधी मंदिर हटवले व मूळ जागेवर पुन्हा उभारले, राज्यातील अनोख्या प्रयोगाची जगभर चर्चा)
अंबेवेसमधील सावजी पेढ्याचे दुकान हे आधीच्या काळात सकाळी 6 वाजता उघडले जायचे. अलीकडच्या काळात दुकान सकाळी 7 वाजता उघडते. वैद्यनाथ मंदिराच्या मार्गावर हे दुकान असल्याने भाविक वर्ग प्रभू वैद्यनाथाला हा पेढा नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी नेतात. 1972 साली सावजी पेढा तीन रूपये किलोने मिळत असे. वाढत्या महागाईमुळे आता वर्ष 2024मध्ये हा पेढा 400 रुपये किलोने विकला जातो. असे असतानाही लोकांनाही हवाय सावजीचाच पेढा.
सावजी पेढ्याचा जन्म
साधारण 1955 मध्ये परळीतील जुन्या गावात असलेल्या जंगम गल्लीत पिलोबा सावजी हे गुढीपाडव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाठी तयार करत होते. पुढे त्यांना पेढा तयार करण्याची संकल्पना सुचली. त्यांनी खवा, साखर वेलचीपासून पेढे तयार करायला सुरुवात केली. आधी या पेढ्याची विक्री ते घरातूनच करत होते. नंतर त्यांनी याची विक्री अंबेवेस भागातील छोट्या दुकानातून सुरू केली. 1962 साली या दुकानाची शासनाकडे नोंदणीही करण्यात आली. पिलोबा सावजी यांच्यानंतर त्यांचा मुलगा गोपीनाथ सावजी यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला. आज पिलोबा यांची तिसरी पिढीतले शिरीष सावजी हे गेल्या 13 वर्षांपासून सावजी पेढ्याची धुरा सांभाळून आहेत. आजही त्याच जागेत सावजी पेढ्याची विक्री केली जाते.
(नक्की वाचा: लाल साडी अन् डोक्यावर लाल कॅप...; महाराष्ट्रातील 'या' गावात महिलांची रात्रभर गस्त, कारण काय?)
आनंदाच्या क्षणी सर्वांच्या मनी घोषवाक्य घेऊन दुसऱ्या शाखेचा आरंभ
पिलोबा सावजी यांनी सावजी पेढा चालवत असताना भाऊ दिगंबर सावजी यांच्या निधनानंतर पाच वर्षांचा असलेल्या पुतण्या वसंत याचा सांभाळ केला. त्यांनी अंबेवेस भागातील दुकानात पुतण्या वसंत सावजी यांनाही पेढ्याचा वारसा दिला. साधारण 1972 साली वसंत सावजी यांनी परळी टॉवरजवळ सावजी पेढ्याची दुसरी शाखा सुरू केली. आता सावजी पेढ्याची दुसरी चव वसंत सावजी यांनी निर्माण केली. आता हा पेढा कमी साखरेचा असल्याने याचीही मागणी वाढत गेली. आनंदाच्या क्षणी सर्वांच्या मनी या प्रमाणे टॉवर परिसरात हे सावजी पेढ्याचे दुकान आजही खवय्यासाठी सुरूच आहे. येथील साखरेचे रुखवत व हलव्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गुरूंचे व काकांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने व्यवसायात प्रगती करू शकलो, असे वसंत सावजी यांनी एनडी टीव्हीशी बोलताना सांगितले.
सावजी पेढ्याचे राजकीय किस्से
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईला सगळे मिळते पण परळीच्या सावजी सारखा पेढा मिळत नाही असे म्हटले होते. पंकजा मुंडेंच्या दहावीच्या निकालानंतर आपल्या स्वीय सहाय्यकाला सांगून मुंडेंनी सावजीचाच पेढा आणायला सांगितला होता. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही सावजींच्या पेढ्याचा पसंती असल्याचे वसंत सावजी यांनी सांगितले.