राहुल कुलकर्णी, बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी अड्डा राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यात सुरु असलेली गुन्हेगारी, प्रशासनावरील दबावामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील तब्बल 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीसाठी बीड जिल्हा नको.. अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्याची प्रतिमा, पोलिसांवरील सातत्याचे आरोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर जिल्ह्यांतील अधिकारी येथे येण्यास तयार नाहीत. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता नोकरी धोक्यात येईल की काय, अशी भीती वाटते. त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विनंती बदलीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. पोलीस महासंचालकांकडे 59 अर्ज आणि आयजींकडे 48 अर्ज आहेत.
पोलिस महासंचालकांकडे 8 वर्षे पूर्ण झाल्याने बदलीपात्र 9 पोलिस निरीक्षक आणि 6 सहायक निरीक्षकांनी अर्ज केले. विनंती बदलीसाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 10 पोलिस निरीक्षक, 15 सहायक पोलिस निरीक्षक, 16 पोलिस उपनिरीक्षक, तांत्रिक शाखेतील 4 अधिकारी आणि महामार्ग विभागातील 3 अधिकाऱ्यांनी अर्ज केले, अशी ग्राम माहिती ती पोलिस प्रशासनातील सूत्रांनी दिली.
तसेच महानिरीक्षकांकडे 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने 2 पोलीस निरीक्षक, 7 सहायक पोलिस निरीक्षक आणि 6 पोलीस उपनिरीक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले. विनंती बदलीसाठी 6 पोलिस निरीक्षक, 8 सहायक पोलिस निरीक्षक आणि 19 पोलिस उपनिरीक्षकांनी अर्ज केले आहेत. या अर्जांमागे प्रशासकीय कारणे, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांची आजारपण अशी कारणे देण्यात आली आहेत.
बदलीसाठी अर्ज केलेल्या 107 अधिकाऱ्यांपैकी 24 जणच प्रशासकीय बदलीसाठी पात्र आहेत. उर्वरित 84 जणांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत. बीड जिल्ह्याची प्रतिमा, पोलिसांवरील सातत्याने होणारे आरोप आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे इतर जिल्ह्यांतील अधिकारी येथे येण्यास तयार नाहीत.
दरम्यान, बीडमध्ये नोकरी धोक्यात येईल, अशी भीती वाटते, त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विनंती बदलीसाठी अर्ज दाखल झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी केली जात आहे. वाल्मीक कराड यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?