- बीड जिल्हा रुग्णालयातील एका आजीला सिटी स्कॅनसाठी झोळीत तळमजल्यावर नेण्यात आले.
- रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आजीच्या वेदनेकडे दुर्लक्ष करत तिला बाहेर विव्हळत सोडले
- संबंधित नर्सला बदलण्यात आले असून एका महिला डॉक्टरलाही नोटीस देण्यात आली आहे
आकाश सावंत
बीड जिल्हा रुग्णालयातील एक माणुसकीला काळीमा फासणारा क्रूरपणा उजेडात आला आहे. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या एका आजीला सिटी स्कॅनसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तळमजल्यावर झोळीत आणले. मात्र सायंकाळी पावणे सहा वाजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला कुलूप ठोकले. निरागस आजी दरवाजाच्या बाहेर झोळीत विव्हळत पडली होती, पण रुग्णालयातील कोणालाही तिच्या वेदनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्याचा व्हिडीओ ही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी इतकं क्रुरपणे कसं वागू शकतं अशी विचार आता केली जात आहे.
या प्रकरणात नर्सने चक्क संबंधीत विभागाला कुलूप लावले. त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. ती आजी त्या विभागा बाहेरच पडून होती. ती विव्हळत होती. कुणी तरी मदत करेल असं तिला वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला. त्यानंतर सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले आहे. तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या वेळी दाखवलेली भव्यता आता रुग्णांच्या वेदनांसमोर सध्या तरी मावळती ठरत आहे.
हीबाब जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिकेला तत्काळ तिथून बदलण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं. शिवाय संबंधित एका महिला डॉक्टरला देखील नोटीस देण्यात आल्याची माहिती डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे. अशा घटना होवू नयेत यासाठी काळजी घेतली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी आपण तिथे नव्हतो असं ही त्यांनी सांगितलं आहे.
या संपूर्ण प्रकरणातून रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाची उदासीनता समोर येत आहे. अशी घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. चार दिवसापासून या रुग्णालयाची लिफ्ट बंद आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी हातावर किंवा झोळीत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अशा स्थितीत हे रूग्णालय सध्या आली सेवा देत आहे. त्यामुळे या रूग्णालयाच्या सोयी सुविधांवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी रुग्णालय असल्यानं इथं गोरगरिब मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. पण त्यांच्या पदरी असा गोष्टी पडतात.