Beed Crime : संताच्या भूमीत दहशतीचे वातावरण ! बीड की बिहार ?

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे.

जाहिरात
Read Time: 5 mins
मुंबई:

अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार

बीड आणि परभणीच्या घटनांनी सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे या घटनांमुळे निघत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत, त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे. जेव्हा कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक होते, गुंड व माफियांचे समांतर प्रशासन सुरू होते, तेव्हा बिहारसदृष्य परिस्थिती झालीय, असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात बिहारच्या स्थितीत बरीच सुधारणा झालीय. पण ही तुलना होतेच. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याने आता "बिहार" होण्याचा बहुमान मिळवलाय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विधानसभा निवडणुकीत अजीर्ण होईल एवढे यश मिळाल्याने महायुतीचे सरकार सत्तेवर यायला महिनाभराचा कालावधी लागला. बहुमत मिळालेली मंडळी सत्तेचे वाटे करण्यात गुंतलेले असताना महाराष्ट्रात बीड आणि परभणी येथे शांततेला तडा देणाऱ्या घटना घडल्या. संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केल्याचे समोर आल्याने परभणीत तणाव निर्माण झाला. तेथील स्फोटक परिस्थिती अतिशय नाजूकपणे हाताळणे आवश्यक असताना पोलीसानी बळाचा अवाजवी वापर केल्याने हिंसक प्रतिक्रिया उमटली. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांकडून बळाचा अतिरेकी वापर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनीही कबूल केले आहे. तर दुसरीकडे बीड मध्ये पोलिसांनी बळाचा वापर करणे आवश्यक असतानाही तो केला नाही, असा आरोप आहे. गुन्हेगारांनी थैमान घातलेले असताना पोलिसांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट त्यांना मदत केल्याचे आरोप विरोधक करतायत. 

( नक्की वाचा :  Prajakta Mali vs Suresh Dhas : सुरेश धस यांचा यू टर्न, टीकेनंतर 24 तासांमध्ये व्यक्त केली दिलगिरी )
 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मागच्या आठवड्यात बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यामागील खऱ्या सूत्रधारांना अटक करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या हत्येमागे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटचे सहकारी असलेल्या वाल्मिकी कराड यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणीही जोर धरत आहे. 

Advertisement

धनंजय मुंडे यांच्या विरोधात केवळ विरोधी पक्षानेच नाही तर सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनीही खुलेआम दंड थोपटले आहेत. भाजपाचे सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळुंखे आदी नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे यश मिळवून सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारला रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अजून 15 दिवस होत नाही तोवर मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी पुढे आली आहे. 

( नक्की वाचा : सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी! सुरेश धस यांनी सांगितला 'आकाचा' परळी पॅटर्न )
 

पाशवी बहुमताचा बळावर विरोधकांना नमवणे अवघड नाही. बीड प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. या स्थितीत लोकभावनेचा रेटा वाढला तर तो थोपवणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी एवढे सोपे असणार नाही. 

Advertisement

वाल्मिकी कराड यांचे नाव सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणात पुढे येत आहे. कायद्याचे हात लांब असतात म्हणे, पण ते अजून तरी त्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत. यावरून बाहेरच्या आणि महायुतीतील नेत्यांनी धनंजय मुंडे यांना घेरले आहे. पुराणामध्ये एक दाखला आहे. कुरु वंशातील परिक्षीत राजाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. परिक्षिताचा पुत्र राजा जनमेजय याला आपल्या पित्याचा मृत्यू  तक्षक या सापाच्या दंशामुळे झाला आहे, हे कळले. त्यामुळे बदला घेण्यासाठी त्याने सर्पयज्ञ करून संपूर्ण सर्प प्रजातीचा सर्वनाश करण्याचे ठरवले.  त्यामुळे तक्षक या सापाने आपला जीव वाचवण्यासाठी इंद्रदेवाच्या आसनाखली आश्रय घेतला. 

इंद्राच्या सामर्थ्यामुळे आपले प्राण वाचतील अशी आशा त्याला वाटत होती. हे समजल्यावर, राजा जनमेजयाने, त्या तक्षकाला जो सहाय्य करेल, त्याच्यासह आहुती या यज्ञकुंडात देऊन त्याला भस्म करा, अशी गर्जना केली.  'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' म्हणत आहुती दिली. त्यामुळे इंद्राने तक्षकाला सोडून दिले, अशी ती कथा आहे. राजकारणातील लोकांना पुराणातील ही कथा नक्की माहिती असेल. कारण तक्षकाला केव्हा आश्रय द्यावा व केव्हा हात काढून घ्यावा हे मुरब्बी राजकारण्यांना पक्के माहीत असते. 

Advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर नागपूर अधिवेशनात विधिमंडळात मॅरेथॉन चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली केली, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असे ही जाहीर केले . पण मागच्या दहा दिवसात आरोपींचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. आता हे प्रकरण सीआयडीकडे दिले आहे.  

बीड जिल्ह्यातील वाळूमाफिया आणि भूमाफियांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत एक मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. पण अजून तरी या दिशेनेही कुठली कारवाई झालेली दिसली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचीही हत्या झाल्याचा दावा करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळ उडवून दिली आहे. यात तथ्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एखाद्या थरारक चित्रपटाप्रमाणे या प्रकरणात रोज काही तरी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 

संताच्या भूमीत दहशतीचे वातावरण !

मराठवाड्याला संतांची भूमी म्हटले जाते. पण अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांनी मराठवाड्याच्या या प्रतिमेला काही तडे नक्की गेले आहेत. आरक्षणाच्या लढाईमुळे झालेल्या ध्रुवीकरणाचे परिणाम गावागावात दिसतायत. खरेतर बीड हा कष्टकरी ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा. काही तुरळक घटना वगळता बीड जिल्हा नेहमीच शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण अलीकडच्या काळातील हिंसक राजकीय संघर्ष, त्यासाठी पोसलेले गुंड, वाळू माफियांचा सुळसुळाट, गुंड प्रवृत्तीना मिळणारा राजाश्रय यामुळे बीड जिल्ह्याचे वातावरण बिघडले आहे. 

बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात तब्बल तीनशेहून अधिक हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे.  मागील पाच वर्षात खुनाचे प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल झाले आहेत.  मागील पाच वर्षात 782 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे गांभीर्य लक्षात येते. 

बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक 1222 अधिकृत शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात अनधिकृत शस्त्रे  असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने घेण्याची आवश्यकता तेथील लोकांना का वाटतेय. गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढलेला सुळसुळाट याला कारणीभूत आहे का ?  की पोलिसांवरचा  विश्वास उडाला आहे ? शस्त्र परवाने या एकमेव बाबीचा विचार केला तरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती कशी आहे हे लक्षात येते.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्याचे काय परिणाम दिसतात हे येणाऱ्या काळात कळेलच. बीड जिल्ह्यातील माफिया राज बंद करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री व्हावे, अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे लोक करतायत. स्थानिक नेतृत्वावरचा अविश्वास पुरेसा बोलका आहे 
 

Topics mentioned in this article