आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed Success Story: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या दिंद्रुडमधील एका जिद्दी माऊलीने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. दोन लहान मुलांची जबाबदारी आणि घरात आर्थिक अडचणींचा डोंगर असतानाही सुमय्या नावाच्या या तरुणीने हार मानली नाही. आपल्या दिव्यांग वडिलांच्या डोळ्यांत स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद पाहण्यासाठी तिने अवघ्या दोन वर्षांत रेल्वे पोलीस होण्याचा मान मिळवला आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात
सुमय्याच्या घरची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची होती. तिचे वडील दिव्यांग असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. लग्नानंतर दोन मुलांचा सांभाळ करत असतानाच तिने शासकीय नोकरी मिळवण्याचा ठाम निर्धार केला.
घरकाम, मुलांचे संगोपन आणि दिव्यांग वडिलांची सेवा अशी तारेवरची कसरत करत तिने पोलीस भरतीचा सराव सुरू ठेवला. गेल्या दोन वर्षांपासून तिने दिवसरात्र एक करून शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी मेहनत घेतली होती.
( नक्की वाचा : Beed News: अंबाजोगाईतील बड्या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? शाळेच्या कपाटात सापडले साहित्य! 15 वर्ष... )
यशाचा जल्लोष आणि तो भावनिक क्षण
सुमय्याची मेहनत अखेर फळाला आली असून तिची निवड मुंबई लोहमार्ग पोलीस दलात झाली आहे. या यशाची बातमी समजताच संपूर्ण दिंद्रुड गावात आनंदाचे वातावरण पसरले. विजयाचा जल्लोष करताना सुमय्याने आपल्या दिव्यांग वडिलांना चक्क खांद्यावर उचलून घेतले. आपल्या लेकीचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. हा भावूक क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते.
तरुणाईसाठी यशाचा नवा मंत्र
सुमय्याचा हा प्रवास केवळ एक सरकारी नोकरी मिळवण्यापुरता मर्यादित नाही. संकटे कितीही मोठी असली तरी जर मनात जिद्द असेल, तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे तिने सिद्ध केले आहे. दोन मुलांची आई असूनही तिने आपल्या ध्येयापासून स्वतःला दूर होऊ दिले नाही. आज तिच्या या यशामुळे माजलगाव तालुक्यात तिचे मोठे कौतुक होत असून अनेक तरुण मुलींसाठी ती एक आदर्श ठरली आहे.