Beed to Ahilyanagar Train Service Update : बीड आणि अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलंय. या मार्गावर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबरला पहिल्यांदा रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आहे. कारण, या निमित्तानं पहिल्यांदाच रेल्वेच्या नकाशावर बीड शहर येणार आहे. बीडच्या नागरिकांनी पाहिलेलं मोठं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होईल, अशी माहिती आहे. उद्घाटनाची तारीख जवळ येत असल्यानं बीड स्टेशनचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलं आहे. स्टेशनवर विद्युतीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
कसा आहे रेल्वे मार्ग?
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1,822.168 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
एकूण पूल: 130 (रेल्वेखालील), 65 (रेल्वेवरील).
मोठे पूल: 65
छोटे पूल: 302
या प्रकल्पाची द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार एकूण किंमत 4,805.17 कोटी रुपये आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के हिस्सा (प्रत्येकी 2,402.59 कोटी रुपये) उचलणार आहेत.
16 स्टेशनवर थांबणार रेल्वे
गेली 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प गेल्या 2 वर्षांत वेगाने पूर्ण करण्यात आला. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य रेल्वे स्थानक आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. बीड ते अहिल्यानगर या मार्गावर एकूण 16 स्टेशनवर ही रेल्वे थांबणार आहे.
( नक्की वाचा : Beed News: प्रतीक्षा संपली! 40 रुपयांत बीडहून अहिल्यानगरला रेल्वेने जा; किती स्टेशन असणार? वाचा सर्व माहिती )
ही डेमू रेल्वे 168 किलोमीटरचा प्रवास अंदाजे 5 तास आणि 30 मिनिटांत पूर्ण करेल. कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बीडकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे, अशी माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिलीय.