Mumbai BEST Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण- तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन सेवा देणाऱ्या 'बेस्ट' (BEST) उपक्रमात ३६४ बस वाहक (कंडक्टर) पदांसाठी सरळसेवा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Sugar Hike: ऐन सणासुदीत साखर महागली! सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर कशामुळे वाढले?
बेस्ट उपक्रमात भरती, काय आहे शैक्षणिक पात्रता?
या भरतीसाठी उमेदवारांकडे काही शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता असणे बंधनकारक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, तसेच तो मराठी आणि इंग्रजी विषयात पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराकडे वैध (Valid) बस वाहक परवाना (Conductor License) असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे असून, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ती १८ ते ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच शारीरिक निकषांनुसार, पुरुषांसाठी किमान १६४ सेंटीमीटर उंची आणि किमान ४५ किलो वजन असणे आवश्यक आहे.
कशी होणार निवड? पगार किती?
उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेच्या (CBT) आधारे केली जाईल. या परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असणार आहे. परीक्षेत यशस्वी होणाऱ्या निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना २२,५00 रुपये मूळ वेतन तसेच नियमानुसार विविध भत्ते मिळणार आहेत. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना सरकारी सेवेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबई पालिकेतील शाळा निरीक्षकांची ४४ पदांची भरती..
त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळा निरीक्षकांची ४४ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवून बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून २०२२ पासून रिक्त असलेल्या निरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागात शाळा निरीक्षकांची एकूण ८८ पदे, त्यापैकी सध्या ४४ पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक अर्हता, टीईटी परीक्षा आणि वयोमर्यादेबाबत अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world