Bhandara News: पालकांची भीती, 12 वर्षांच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव; नेमकं काय झालं?

Bhandara News: भंडारा जिल्ह्याच्या पवनीमध्ये एका 12 वर्षीय विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षेच्या भीतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभय भुते, भंडारा

अभ्यासाचा ताण किंवा शाळेतील खोडसाळपणा कधीकधी मुलांच्या मनात किती भीती निर्माण करू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात पाहायला मिळाले. शाळेत केलेल्या एका चुकीची शिक्षा मिळेल आणि पालकांना शाळेत बोलावल्यामुळे आपली पोलखोल होईल, या भीतीने एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचे नाटक रचले. या प्रकारामुळे पालकांसह पोलीस प्रशासनाचीही तीन तास चांगलीच धावपळ झाली.

नेमकं प्रकरण काय?

पवनी शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने शाळेत काहीतरी खोडसाळपणा केला होता. याची दखल घेत शिक्षकांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. शिक्षकांनी पालकांना बोलावल्यामुळे आता घरी आपल्याला कडक शिक्षा होईल, अशी भीती त्या मुलाच्या मनात बसली.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)

अपहरणाचा थरारक प्लॅन

पालकांना शाळेत नेण्याऐवजी या मुलाने घरून निघाल्यावर एक वेगळाच कट रचला. त्याने एका स्थानिक नेत्याच्या गाडीवर लिफ्ट मागितली आणि बस स्टॉपपर्यंत प्रवास केला. बस स्टॉपवर पोहोचल्यानंतर त्याने आपल्या पालकांना फोन केला. "कोणीतरी मला चाकूचा धाक दाखवून पळवून नेले आहे," अशी खोटी माहिती त्याने रडत रडत पालकांना दिली.

पोलिसांची कारवाई आणि बनाव उघड

मुलाचे अपहरण झाल्याची बातमी ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पवनी पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली आणि विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांना मुलाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. अखेर तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर मुलाला सुरक्षितरीत्या शोधून काढण्यात आले. 

Advertisement

पोलिसानी कसून चौकशी केली असताना मुलाने शिक्षेच्या भीतीने हे सर्व केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर पोलिसांनी मुलाचे समुपदेशन करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले आहे. मात्र, या प्रकारामुळे पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद साधणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Topics mentioned in this article