मनोज सातवी, प्रतिनिधी:
Bhayandar East Fire: मीरा भाईंदरमधून एक भीषण आगीची बातमी समोर आली आहे. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात लोधा कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर आग लागली आहे. या आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी अंत झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या आगीमध्ये काही जनावरेही दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
भाईंदरमध्ये अग्नितांडव
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिरा भाईंदर शहरात शुक्रवारी रात्री एका भीषण आगीच्या दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील इंद्रलोक फेज-४ परिसरातील एका झोपडपट्टी आणि तबेल्याला गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत दोन निष्पाप बालकांसह एका ४० वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, यात काही मुक्या जनावरांचाही बळी गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
इंद्रलोक परिसरातील दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेजारीच असलेल्या तबेल्यालाही आपल्या कचाट्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत तीन जीव कायमचे शांत झाले होते.
शोधमोहिम राबवण्यास अडचण
रात्रीच्या वेळी परिसरात सर्वत्र अंधार असल्याने शोधमोहीम राबवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह असण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने स्थानिक प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. उद्या पहाटे पुन्हा एकदा सविस्तर पंचनामा आणि शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.