अविनाश पवार, प्रतिनिधी
Bhimashankar Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. भीमाशंकर मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी लागू केलेली ऑनलाईन पास बुकिंगची सक्ती आता शिथिल केली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या नव्या आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दूरवरून येणाऱ्या हजारो भाविकांना आता थेट आणि सुलभ दर्शन घेता येणार आहे.
काय आहे नवा निर्णय?
भीमाशंकर मंदिर प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच भाविकांच्या सुविधेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी ऑनलाईन पास बुकिंग व्यवस्था सुरू केली होती. मात्र, ऑनलाईन बुकिंगच्या वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना पास मिळण्यात होणारा त्रास यामुळे अनेक तक्रारी समोर येत होत्या.
लांबचा प्रवास करून आलेल्या अनेक शिवभक्तांना पासअभावी दर्शन न घेताच परतावे लागत असल्याने भाविकांमध्ये मोठी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेत सकाळी 7 ते 11 या 4 तासांच्या कालावधीत मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना सरसकट थेट दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
( नक्की वाचा : Monsoon Update: उकाड्यापासून लवकरच सुटका! मुंबईकरांनो छत्री काढून ठेवा, मान्सूनबाबत हवामान विभागाची नवीन घोषणा )
फक्त 5 महिन्यांत पूर्ण झाले मोठे काम
नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवावरून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी एक खूप मोठा वर्ग भीमाशंकर दर्शनासाठी येण्याची दाट शक्यता आहे.
ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भीमाशंकर येथे नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या कामासाठी देवस्थान ट्रस्टने 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला नंतर 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराच्या पैशांवर डल्ला मारणारे 6 संशयित कोण? SIT चौकशीत मोठे मासे अडकणार! )
सामान्य परिस्थितीमध्ये या मुख्य सभामंडपाच्या भव्य कामासाठी सुमारे 1 वर्षाचा कालावधी लागणे अपेक्षित होते. तथापि, भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या अभूतपूर्व सहकार्यामुळे रात्रंदिवस अखंड काम सुरू ठेवण्यात आले. त्यामुळेच हे काम केवळ 5 महिन्यांत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. आता नवीन सभामंडप तयार झाल्यामुळे आणि ऑनलाईन पासची सक्ती काही तासांसाठी शिथिल केल्यामुळे शिवभक्तांचा भीमाशंकरचा दर्शन मार्ग अधिक सोपा आणि सुखकर झाला आहे.