भुपेंद्र अंबवणे, भिवंडी:
Bhiwandi Congress News: भिवंडी महानगर पालिका महापौर पद निवडीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. महापौरांच्या निवडीआधी भाजपमध्ये दोन गट पडल्याने काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे. यासंदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
भिवंडीमध्ये वाद उफाळला..
भिवंडी महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडीवरुन काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्ष भाजपला विकल्याचा आरोप करत भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी संताप व्यक्त केला आहे. शहराध्यक्षांच्या या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत कलह सुरु असल्याचे बोलले जात आहे.
९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे ३० व राष्ट्रवादीशरद पवार गटाचे १२ असे ४२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महापौर पदासाठी केवळ चार सदस्यांची आवश्यकता आहे. मात्र याबाबतच्या वाटाघाटी करण्याच्या कोणत्याही सूचना मला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिल्या नाहीत, असा दावा शहराध्यक्षांनी केला आहे.
थेट राहुल गांधींकडे तक्रार
याऊलट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप रशीद ताहीर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीत राहुल गांधींना पत्र लिहित लेखी तक्रारही केली आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष यांच्या या तक्रारीमुळे भिवंडीत महापौर पदाच्या निवडणुकीत शुक्रवारी नेमके काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world