Marathi- Hindi Row: भाजप आमदाराकडून मराठीचा अवमान! कार्यालयाची पाटी पुन्हा गुजराती भाषेत केली, मनसे आक्रमक

मनसे, भाजप नवी मुंबई मधील पदाधिकारी व इतर मराठी माणसांचा दबाव आल्यानंतर ती पाटी गुरुवारी 17 जुलै रोजी मराठीत करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई: भाजपच्या गुजरातमधील आमदाराने नवी मुंबई, सीवूड्स मधील पक्ष कार्यालयाची पाटी पुन्हा गुजराती करून मराठी माणसाचा अपमान केल्याचे समोर आले आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर ही पाटी मराठीमध्ये करण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा गुजराती भाषेत करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मनसैनिकांनी  नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबई, सीवूड्स, सेक्टर-42मधील शेल्टर आर्केड या सोसायटी मध्ये भाजपचे गुजरात मधील आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जाडेजा यांनी त्यांचे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय थाटले आहे. पण त्याच्यावरील पाटी ही पूर्णपणे गुजरातीमध्ये होती. मनसे, भाजप नवी मुंबई मधील पदाधिकारी व इतर मराठी माणसांचा दबाव आल्या नंतर ती पाटी गुरुवारी 17 जुलै रोजी मराठीत करण्यात आली.

BMC Schools: मुंबईत हिंदीला पसंती, मराठी पिछाडीवर; महापालिका शाळांची आकडेवारी आली समोर

सर्व वातावरण निवळलेले असताना परत आता ती पाटी गुजराती करण्यात आली आहे. मराठीचा अंतर्भाव अत्यंत सूक्ष्म अक्षरांत करण्यात आला आहे. हा महाराष्ट्राच्या कायद्याचा भंग तर आहे. परंतु हा मराठी भाषेचा अपमान करून समस्त मराठी माणसाला चेतावणी देण्याचा भाग आहे. या आमदाराला बहुदा नवी मुंबईतील वातावरण बिघडवायचे आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे, असा आरोप मनसेने केला आहे.

याप्रकरणी मनसेने एन.आर.आय सागरी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. या आमदारावर आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणे जरुरी आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तसेच  सर्व मराठी जणांना, राजकीय पक्षांना, सामाजिक संघटनांना सोबत येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement

Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा