Chhatrapati Sambhaji Railway Station: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विधान परिषदेचे सदस्य संजय केणेकर (BJP legislator Sanjay Kenekar) यांनी मंगळवारी (28 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील उर्दू भाषेतील फलकावर आक्षेप नोंदवलाय. रेल्वे स्टेशनवरील उर्दू भाषेमध्ये लिहिलेले 'छत्रपती संभाजीनगर' (Chhatrapati Sambhajinagar) नावाचे फलक काढून टाकण्याची मागणी केणेकर यांनी केलीय.
तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचे 'छत्रपती संभाजीनगर' असे नामांतर करण्यात आले. यानंतर मागील आठवड्यामध्ये सरकारने औरंगाबाद रेल्वे स्टेशनचंही नाव बदलून छत्रपती संभाजीनगर स्टेशन असे करण्याची अधिसूचना जारी केली होती.
उर्दू भाषेतील फलकाविरोधात भाजपा आमदाराने नोंदवला आक्षेप
महाराष्ट्र विधान परिषदचे सदस्य संजय केणेकर यांनी म्हटलं की, "अधिसूचनेमध्ये उर्दू भाषेचा उल्लेख नाही तर फलकावर त्या भाषेतील नाव का लिहिण्यात आलंय? अधिसूचनेमध्ये केवळ हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. उर्दू भाषेतील नाव पाहून मी हैराण झालो".
केणेकर यांनी यावेळेस उपहासाने असंही म्हटलं की, "रेल्वे अधिकाऱ्याचे नातेवाईक मुघलांसोबत काम करत होते का? मी त्यांना फोन करून बदल करण्यास सांगितलंय. ज्यांनी आपला इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, अशा अनेक शाही राजवटी आणि ब्रिटिश राजवट देशाने पाहिल्या आहेत. उर्दू भाषेमध्ये नावे लिहिणे म्हणजे आमच्यावर निजामी भाषा लादण्याचा प्रयत्न आहे."
छत्रपती संभाजीनगर हे शहर वर्ष 1948 पर्यंत हैदराबादच्या निजामाच्या संस्थानाचा भाग होते आणि त्यावेळेस या शहरास औरंगाबाद असे म्हटलं जायचे.
(नक्की वाचा: Mumbai BMC Election News: मुंबई महापालिकेच्या तिजोरीभोवती अॅनाकोंडाचा विळखा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार)
इम्तियाज जलील यांची भाजपावर टीका
उर्दू भाषेमध्ये नाव लिहिल्याबद्दल भाजप नेत्याने नोंदवलेल्या विरोधावर AIMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलंय की, "आम्ही येथे पिट लाइनच्या उद्घाटनाची अपेक्षा करत होतो, पण ते तर फलकांचे उद्घाटन करत आहेत. जर त्यांना (भाजपा) अन्य भाषा येत नसतील तर ही त्यांची समस्या आहे. उर्दू नावाला विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की दिल्ली रेल्वे स्टेशन, ज्या शहरात त्यांचे प्रमुख नेते बसतात, त्या रेल्वे स्टेशनचंही नाव उर्दू आणि पंजाबी भाषेमध्ये लिहिलेले आहे."
Content Source : PTI Bhasha