सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. राजकारण बाजूला ठेवून अन्यायाविरुद्ध लढा देणारा आमदार अशी ओळख सुरेश धस यांची या दरम्यान तयार झाली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी सुरेश धस देशमुख कुटुंबियांसोबत उभे राहिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी चकीत करणारी भूमिका घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात आरोप असलेल्या पोलिसांना मोठ्या मनाने माफ करावं अशी विनंती सुरेश धस यांनी आंदोलकर्त्यांना केली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी परभणीत लाँग मार्च काढण्यात आला होता. येथील आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सुरेश धस यांनी म्हटलं की, "मला वाटतं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही. या पोलिसांची डिपार्टमेंटने चांगलीच कान उघडणी केली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल व्हावे हा आग्रह धरु नये. अर्थात कायद्याचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे. मात्र संघर्ष न करत त्या पोलिसांनाही मोठ्या मनाने माफ करावं, अशी मी विनंती करतो."
मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा- सुषमा अंधारे
"देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आमदार सुरेश धस सांगतात तसं, चला आपण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करु. धससाहेब तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा! फिट्टमफाट हिशोब होईल", असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुरेश धस यांचा संतोष देशमुख यांना वेगळा न्याय आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना वेगळा न्याय, असं का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. संतोष देशमुख प्रकरणात अन्याविरुद्ध लढणारा 'मसिहा' अशी ओळख बनलेल्या सुरेश धस यांच्या प्रतिमेला या भूमिकेमुळे कुठेतरी तडा गेला आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात लढा देताना सुरेश धसांनी जे कमावलं ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे गमावलं, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
काय आहे प्रकरण?
परभणीत झालेल्या हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशींना अटक केली होती. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोस्टमॉर्टमध्ये त्यांना दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला होता, स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सूर्यवंशी कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.