अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजपचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याला फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या धमकीनंतर सचिन शिंदे यांनी महेश प्रेमळवारविरोधात पत्राद्वारे तक्रार केली आहे.
ताडोबा सफारी बुकिंगसाठी शिवीगाळ...
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. सध्या सफारी बुकिंग हाऊसफुल आहे. अतिविशिष्ट व्यक्तींसाठी तसेच मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासाठी ताडोबा सफारी बुकिंगसाठी व्यवस्थापन कोटा आहे. त्याची जबाबदारी ताडोबाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडे आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याला फोन केला. बुकिंगवरून प्रेमळवार यांनी महिला कर्मचारी तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना फोनवर अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली.
नक्की वाचा - Gondia News : जागतिक अस्थिरतेचा फटका; महाराष्ट्रातील 'या' विमानतळाला लागलं टाळं?
व्यवस्थापन कोट्याच्या जबाबदारीतून मुक्त करा
जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरून अनेक आमदारांचे स्वीय सहाय्यकांकडून एकत्रित सफारीची मागणी करण्यात येते. ती बेकायदेशीर आहे. प्रेमळवार यांच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करावी ही विनंती करतानाच फोनवर धमकी दिलेल्या ऑडिओची रेकॉर्डिंग पाठवलेली आहे. दरम्यान शिंदे या सर्व प्रकारामुळे चांगलेच अस्वस्थ झाले असून त्यांनी व्यवस्थापन कोट्याच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशीही मागणी केली आहे.