Metro Line 3 Timetable: मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी तसेच मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो प्रशासनाने आरे - कफ परेड रोड भुयारी मेट्रो 3 सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार...
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणारे मतदान आणि या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी 'आरे ते कफ परेड' या मेट्रो ३ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
KDMC Election 2026: मतदार यादीत नाव कसं शोधायचं? बातमीतील QR Code लगेच स्कॅन करा आणि मिळवा सर्व माहिती
पाहा वेळापत्रक
सध्या आरे आणि कफ परेड या दोन्ही स्थानकांवरून मेट्रोची पहिली फेरी सकाळी ५:५५ ला सुटते, तर शेवटची फेरी रात्री १०:३० वाजता असते. मात्र, मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना केंद्रावर लवकर पोहोचता यावे आणि मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घरी परतणे सुलभ व्हावे, यासाठी ही वेळ बदलण्यात आली आहे. गुरुवारी मेट्रोची सेवा सकाळी ५:०० वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत सुरू राहील. म्हणजेच सकाळी एका तासाने आणि रात्री दीड तासाने सेवा वाढवण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२६ पासून पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या ३३.५ किमी लांबीच्या या भुयारी मार्गिकेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज सरासरी दीड लाख प्रवासी या मार्गिकेचा वापर करत आहेत. निवडणुकीच्या दिवशी रस्ते वाहतुकीवर येणारा ताण आणि कर्मचाऱ्यांची गरज ओळखून घेतलेला हा निर्णय मेट्रोच्या वाढत्या लोकप्रियतेत मोलाची भर घालणारा ठरेल.
( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )