How to check name in KDMC voter list: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. शहराचा पुढचा कारभारी निवडण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची ही प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी सुद्धा विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदानाची जय्यत तयारी आणि यंत्रणा
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकूण 31 प्रभागांमधील 122 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र यापैकी 20 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे आता प्रत्यक्षात 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या 102 जागांवर नशीब आजमावण्यासाठी एकूण 488 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मतदानासाठी प्रशासनाने एकूण 1548 मतदान केंद्रे निश्चित केली असून त्यातील 25 केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदानासाठी 7500 ईव्हीएम मशिन्स सज्ज ठेवण्यात आल्या असून तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने पर्यायी मशिनरी पुरवण्याची सोयही करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )
कडक पोलीस बंदोबस्त आणि ड्रोनची नजर
निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. 2 पोलीस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 2134 पोलीस कर्मचारी आणि 1456 होमगार्ड असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची विशेष करडी नजर असणार आहे. तसेच जमिनीवरील बंदोबस्तासोबतच आकाशातूनही लक्ष ठेवण्यासाठी 24 ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. हालचालींवर बारीक लक्ष ठेवून शांततेत मतदान पार पाडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सोय
महापालिकेने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध पावले उचलली आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर्स, स्वयंसेवक आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मतदारांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांसाठी आणि मतदारांसाठी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता आणि फिरत्या शौचालयांची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
मतदार यादीत तुमचे नाव आणि केंद्र कसे शोधणार? (How to Find Your Name in Voter List Online?)
अनेकदा मतदारांना आपले नाव कोणत्या यादीत आहे किंवा आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे, हे माहित नसते. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने https:kdmc.localbody.org/Home/Voter_Search ही लिंक आणि क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मतदारांनी या लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिथे आपले नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव टाकून सर्च करावे. जर तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यावरील ईपीआयसी नंबर टाकूनही तुम्ही माहिती मिळवू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, प्रभाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे जीपीएस लोकेशनही मिळेल. याचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यास मतदानाच्या दिवशी तुमचा वेळ वाचेल.

गेल्या दहा वर्षात कल्याण डोंबिवलीतील मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2015 च्या निवडणुकीत मतदारांची संख्या 12 लाख 50 हजार 646 इतकी होती. आता 2026 मध्ये ही संख्या 14 लाख 24 हजार 520 वर पोहोचली आहे. यामध्ये 7 लाख 45 हजार 392 पुरुष, 6 लाख 78 हजार 576 महिला आणि 552 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानाची ही राष्ट्रीय जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी आणि लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world