छत्तीसगड: छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सिमेवर ग्रेहाऊंड सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत तेलंगणा ग्रेहाऊंडच्या सैनिकांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच घटनास्थळावरुन दोन एके 47 आणि एक इन्सास रायफलही जप्त केली आहे. तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्याच्या सीमेवर घटनास्थळी सध्या शोधमोहिम सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगड तेलंगणा सिमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तेलंगणा पोलिसांना मोठे यश मिळाले असून चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात झाली. या चकमकीत येलांडू-नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पपण्णा ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चकमकीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
नक्की वाचा: नव्या सरकारचा 'कारभार'ही जोरदार! हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस अन् डिजीटल; तारीख ठरली!
मुलुगुचे एसपी डॉ. सबरीश यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी माओवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला आहे. कुर्सम मंगू, इगोलापू मल्लैया (सचिव एथुरुनगरम महादेवपूर), मुसाकी देवल, मुसाकी जमुना, जयसिंग (कमिटी सदस्य), किशोर (कमिटी सदस्य), कामेश (कमिटी सदस्य) अशी खात्मा झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. यामध्ये मोठ्या नक्षली नेत्यांसहित सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान, याआधी सप्टेंबर महिन्यातही तेलंगणातील भद्राद्री येथील कोथागुडेम भागात तेलंगणा पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये सहा माओवादी ठार झाले होते तर दोन पोलीस जखमीही झाले होते. मारल्या गेलेल्या माओवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.