Budhwar Peth Story : वेश्याव्यवसाय कायद्याने गुन्हा आहे का? ग्राहकाला खुणावणारे, तिच्या कमाईवर जगणारेही...

एखादी व्यक्ती स्वत:च्या इच्छेने वेश्याव्यवसाय करीत असेल तर कायद्याने तो गुन्हा मानला जातो का?

जाहिरात
Read Time: 2 mins

Budhwar Peth Story :  भारतीय समाजात वेश्याव्यवसाय प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतात. मात्र प्राचीन काळाच्या तुलनेत आताची परिस्थिती वेगळी आहे. जगभरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे वेश्याव्यवसाय चालतात. मुंबईतील कामाठीपुरा तर पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय चालतो. याशिवाय राज्यातील अनेक पट्ट्यात महिलांचा देहविक्रय व्यवसाय चालतो. याला अनेकदा रेड लाइट एरियाही म्हटलं जातं. अनेकदा अशा वस्तींवर रेड पडल्याच्या बातम्या आपल्या वाचनात आल्या असतील. चेहरा लपवून त्या महिलांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यातही नेलं जातं. त्यामुळे अनेकदा हा प्रश्न उभा राहतो की, भारतात वेश्याव्यवसाय गुन्हा आहे का? 

'आरपार' या युट्यूब चॅनलवर 'सहेली' संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांनी वेश्याव्यवसाय आणि कायद्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. 

राहत्या घरात वेश्याव्यवसाय चालवणं गुन्हा आहे का?

एखादी व्यक्ती स्वत:च्या इच्छेने वेश्याव्यवसाय करीत असेल तर तो गुन्हा नाही. मात्र कायद्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे या व्यवसायाचं अपराधिकरण होतं. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कुंटनखाना किंवा वेश्यालय. वेश्यालय म्हणजे, दोन किंवा अधिक व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असतील आणि कशाच्या तरी मोबदल्यात लैंगिक सेवा देत असतील तर त्या जागेलाही कुंटनखाना म्हटलं जाऊ शकतं. जर एखादी व्यक्ती स्वत:च्या घरात अशा प्रकारे लैंगिक सेवा देत असेल तर त्या घरालाही कुंटनखाना म्हटलं जातं. त्यामुळे घरात अशा प्रकारे व्यवसाय करणं गुन्हा आहे.   

Advertisement

नक्की वाचा - 'मला निर्वस्त्र बाई बघायचीये'; 15 वर्षांच्या मुलाची मागणी; बुधवार पेठेतील महिलेचा धक्कादायक अनुभव

व्यवसायाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती ग्राहकाला बोलावत असेल, खुणावत असेल किंवा आवाज देत असेल तर त्यालाही गुन्हा मानलं जातं. 

...तर ही व्यक्तीदेखील गुन्हेगार....

सार्वजनिक ठिकाणच्या २०० मीटरच्या अंतरावर वेश्याव्यवसाय करता येत नाही. तो कायद्याने गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाण म्हणजे, आरोग्य संस्था, धार्मिक संस्था किंवा यांसारखी इतर संस्थेच्या २०० मीटर अंतरावर व्यवसाय करता येत नाही. मात्र आता परिस्थिती पाहिली तर अशा संस्थांच्या आजूबाजूला वेश्या व्यवसाय सुरू आहे. कारण सद्यास्थितीत शहराच्या मध्यभागी वेश्याव्यवसाय सुरू आहे. कारण बहुतांश सर्वच लालबत्ती भाग शहराच्या मध्यभागी असतात, त्यामुळे ते बेकायदेशीर मानले जातात. 

१८ वर्षांपेक्षा मोठी व्यक्ती वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कमाईवर जगत असेल तर ते गुन्हेगार होऊ शकतात. परिणामी देशातील वेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती आणि वेश्याव्यवसाय याला गुन्हा मानला जातो, असं सामाजिक कार्यकर्त्या सेवेकरी यांनी सांगितलं.  

(वरील लेख सोशल मीडियावरील माहितीवर आधारित आहे. NDTV मराठी यातून कोणताही दावा करीत नाही)