अमोल सराफ, बुलढाणा:
Buldhana Accident: बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या नांदुऱ्यात भीषण अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने असलेल्या क्रुझर गाडीने मजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेत ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या सात मजूर महिला गंभीर जखमी झाल्या. तसेच ऑटोरिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बुलढाण्यात भीषण अपघात...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदुरा शहरातील हेलगे नगर परिसरात राहणारे ऑटो चालक प्रताप दशरथ कावरे हे आज २० जानेवारी रोजी त्यांच्या ताब्यातील ऑटोरिक्षा क्रमांक एमएच-२८-एच-३४६८ मधून महिला मजुरांना घेऊन नांदुरा येथून माळेगाव गोंडच्या दिशेने जात होते. त्यांचा ऑटो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पुलाखालून नांदुरा ते मोताळा रोडने जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझर क्रमांक एमएच-२०-सीएच-५४०३ ने त्यांच्या ऑटोला जोरदार धडक लागताच ऑटोरिक्षा रस्त्यावरच पलटी झाला.
या अपघातामुळे ऑटोमध्ये बसलेल्या सातही महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलांना रिक्षाबाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केले असून ऑटो रिक्षाचा चुरा झाला.
नांदुरा-मोताळा मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावरून जाणारे येणारे अनेक वाहनचालक वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करतात. त्यामुळे सातत्याने या रस्त्यावर अपघात घडतात.
महिला मजुर गंभीर जखमी
आजच्या अपघातात जखमी झालेल्या महिला ह्या मजूर असून कष्टकरी कुटुंबातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी ऑटो चालक प्रताप कावरे यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुण पोलिसांनी क्रुझर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१ आणि १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोळंके हे करत आहेत.